Tuesday, August 28, 2018

सप्टेंबर २०१८

✡️ मासिक राशिभविष्य ✡️

राशिभविष्य रवी भ्रमणाचा विचार करून लिहिले आहे. उपासना या महिन्याकरता फलदायी ठरतीलच, तरी प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक उपासनेला अधिक महत्व द्यावे हे निश्चित. वैयक्तिक पत्रिकेनुसार फलिते वेगळी असू शकतात.

♈ मेष :- मागच्या महिन्यात तुम्हाला कामाचे डोंगर उपसू नका असे सांगितले होते, पण याही महिन्यात तुम्हाला उसंत मिळणार नाही असं दिसतंय. जमेची बाजू हीच की आता सूत्र तुमच्या हाती आहेत. अजून थोडे दिवसांत शत्रू पक्षावर योग्य पद्धतीने वचक ठेऊ शकाल. वैवाहिक जीवनात सुद्धा तुम्ही समन्वय साधायचा प्रयत्न करत आहात, याची जोडीदाराला जाणीव राहील. जोडीदार आणि तुमच्या कामाचे क्षेत्र एकच असेल तर मातसांभाळून रहा. कोणत्याही बाबतीतली मतभिन्नता सगळीकडचे वातावरण बिघडवत नाही ना याबाबत सतर्क रहा. बाकी धार्मिक बाबतीत ओढा कमी झाला असला तरी मुद्द्याच्या गोष्टी पार पाडाल. "ती सध्या काय करते?" अशा प्रश्नांबाबत जरा तटस्थ व्हाल. (सूर्योपासना लाभदायी ठरेल.)

♉वृषभ :- सध्या घरात 'हम करे सो कायदा' अशी परिस्थिती आहे, पण मुळात तुमची वृत्ती ती नाहीच. जोडीदाराच्या सोबतीने भाग्योदयाचे दिवस आहेत. व्यवसाय सांभाळून कुटुंबाला वेळ द्याल.पूर्वार्धात जवळच्या प्रवासाचे योग आहेत. गृहसौख्य उत्तम लाभेल. मात्र व्यवसायात गुंतवणूक करताना काळजी घ्या म्हणजे नुकसानीचे प्रसंग टाळता येतील. देवाधर्माच्या बाबतीत पूर्ण तल्लीन होऊन साधना कराल. नकारात्मक मानसिकतेपासून त्याच जोरावर स्वतःला सांभाळू शकाल. वारसा हक्काने मिळणारी संपत्ती आजारपण निस्तरण्यात खर्च होण्याची शक्यता जास्त. योग्य ती काळजी घ्या. (बुधाचा मंत्र लाभदायक आहे.)

♊मिथुन :- आर्थिकदृष्ट्या महिन्याचा पुर्वार्ध उत्तम तर उत्तरार्धात स्वबळावर यश खेचून आणाल. संतातीसौख्य उत्तम लाभेल. त्यांच्या मौजमजेसाठी खर्च कराल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रेमविवाह करण्यास इच्छुक मंडळीना आत्ता बहराचे दिवस आहेत. अकस्मात काही लाभ होतील. वारसा हक्काने जमिन व्यवहारात फायदा होण्याची शक्यता पण मित्रमंडळी पासून सावध रहा. भावंडसौख्य उत्तम. शेअर्स व्यवहारात फायदा होण्याची चिन्हे आहेत तरी योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली गुंतवणूक करा. वैवाहिक जीवनात संयम व तटस्थता स्वीकाराल तर शांतता लाभेल अन्यथा कुरबुरी चालू होतील. (गुरूचा मंत्र म्हणावा.)

♋ कर्क :- आर्थिक बाजू भक्कम राहील. संततीच्या यशाच्या सुवार्ता ऐकून समाधानी व्हाल. तुमच्या कामाचा धडाका आणि घरातील शांत आनंदी वातावरण यांची सांगड घालणे हे आव्हानाचे ठरू शकते. योग्य नियोजन आणि सकारात्मकता यांच्या जोरावर हे जमवू शकाल. जोडीदार उंच शिखर गाठण्याच्या प्रयत्नात आहेच, पण त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसंच तुम्ही योग्य पद्धतीने दिलेला पाठिंबा त्यांचे मनोबल उंचावेल. काही छोटे प्रवास होतील. घरात धार्मिक कार्यक्रम थोडी आधुनिकतेची जोड देऊन पार पाडाल. (दत्त उपासना लाभदायक.)

♌ सिंह :- सध्या सर्व सूत्रे तुमच्या हातात आहेत असं म्हणायला हरकत नाही. तुमची सकारात्मक मानसिकता आणि उत्साही स्वभाव यामुळे आनंदी वातावरण निर्माण कराल. संतातीबाबत मात्र चिंता वाटत राहील. जोडीदाराशी संवाद साधत यातून मार्ग काढा. तब्येतीची काळजी घ्यायला हवी अन्यथा उष्णतेचे विकार डोकं वर काढतील. घरातले धार्मिक कार्य योग्य पद्धतीने पार पाडा, तिथे विनाकारण काही तरी वेगळेपण, आधुनिकता आणण्याचा विचार पुढे त्रासदायक ठरू शकतो. सध्या व्यवसायात आस्ते कदम असलात तरी पुढे गाडी वेग धरेल, त्याकरता थोडा धीर धरा. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. (सूर्योपासना उत्तम फलदायी)

♍ कन्या :- खर्चावर नियंत्रण ठेवा. या महिन्यात या ना त्या मार्गाने हातातील पैसा निसटत राहील, कमी पडणार नाही याबाबत नि:शंक रहा. कुठल्यातरी मार्गाने अकस्मात लाभ होत राहतील. त्याच्या जोरावर मोठ्या योजना आखाल. घरातील ज्येष्ठ मंडळींच्या आरोग्याची चिंता राहील. संततीची घोडदौड आक्रमकपणे चालू राहील. त्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीबद्दल समाधानी रहाल. धार्मिक कार्यात आनंद घ्याल. (गणेश उपासना लाभदायक)

♎ तूळ :-  तुमची सकारात्मक मानसिकता तुमचे व्यक्तिमत्त्व अधिक खुलवेल. घरातले वातावरण थोडे गंभीर व अस्वस्थ करणारे असेल. काही काळ घरापासून लांब राहण्याचे योग दिसत आहेत. जमिन व्यवहारात काही प्रमाणात फायदा होईल. भावंड चिंता, तसेच संतातीची शैक्षणिक क्षेत्राविषयी काळजी वाटत राहील. व्यवसायातील तुमचे धडाकेबाज निर्णय घरच्या वातावरणावर परिणाम करणारे ठरतील. थोरामोठयांच्या ओळखी होतील. मित्रमंडळी पासून लाभ. (कुलदेवीची उपासना करावी.)

♏ वृश्चिक :- आर्थिक आवक पाहता सबुरीनेच घ्यावे लागेल. या महिन्यात करमणुकीसाठी खर्च होईल असे वाटते. चांगली बाब म्हणजे काही देणे बाकी असेल तर ते ही फीटून जाईल. संततीची काळजी राहील. त्यांच्यावर खर्च होण्याची शक्यता. वास्तुपासून लाभ. अचानक काही आजार उद्भवण्याची चिन्हे आहेत, तेव्हा तब्येतीची योग्य काळजी घ्या. जोडीदाराच्या उधळ्या स्वभावाला आवर घालावासा वाटेल. कामाच्या ठिकाणी मात्र तुमचा बडेजाव राहील. तुमची मानसिकता आक्रमक राहिल्याने तिथे वर्चस्व प्रस्थापित कराल. (शिव उपासना लाभदायी ठरेल.)

♐ धनु :- सध्याची साडेसाती ही केवळ संयमाची परीक्षा घेणारी आहे. मुळात तुम्ही अलिप्त स्वभावाचे आहातच, त्यात आता वाढीव खर्च आणि अडकलेले पैसे यांचा सामना करावा लागेल. काही प्रवास होण्याची शक्यता. संततीच्या सुवार्ता. जोडीदाराच्या बरोबर धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. त्यांच्या एखाद्या नवीन कार्यात त्यांना मदत कराल. मित्रमंडळी ही या महिन्यातील जमेची बाजू राहील. त्यांच्या सहवासात आनंदी राहाल. (सूर्य उपासना लाभदायक ठरेल.)

♑ मकर :- सध्याचे दिवस हे अधिकाराचा योग्य वापर व योग्य नियोजनातून ध्येय साध्य करण्याचे आहेत. आर्थिक स्थिती मात्र बेताची राहील. तसेच घरातील वातावरण हे पुर्णतः तुमच्या दृष्टीकोनावर अवलंबून आहे हे लक्षात ठेवून वागा अन्यथा ते प्रक्षोभक असेल हे स्विकारा. जोडीदाराशी संयमाने वागा. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना ठीक राहील. कामाच्या ठिकाणी आनंदी वातावरण ठेवू शकाल. सहकाऱ्यांच्या सहवासाचा लाभ उठवाल. (बुध उपासना उत्तम.)

♒ कुंभ :- वेगवेगळे लाभ होतील. उपासनेचे वेगवेगळे मार्ग चोखळाल आणि समाधान मिळवाल. संतातीसौख्य उत्तम, पण तरीदेखील तुम्हाला सतत काही वेगळी चिंता सतावत राहील. शेअर्स मध्ये गुंतवणूक करताना तसेच इतर कुठे खर्च करताना देखील काळजीपूर्वक करा. जोडीदाराची घोडदौड समाधानकारक असेल, पण तुमच्या संयमाचा लगाम तुम्ही हातात घ्याल असे वाटते. तुमच्या कामाच्या ठिकाणी मात्र थोडी खिळ बसते आहे. अधिकारांचा म्हणावा तसा उपयोग होत नाही असे दिसते आहे. लवकरच कोंडी सुटेल. (कुलदेवीची उपासना लाभदायक ठरेल.)

♓ मीन :- धनलाभाचे अनेक वेगळे पर्याय खुणावत आहेत पण संयम बाळगणेच हिताचे राहिल. आरोग्याची काळजी घ्या, दुर्लक्ष करू नका. भावंडांकडून लाभ होतील. जोडीदाराचे सहकार्य उत्तम मिळेल. व्यवसायात व्यवहार करताना समोरील व्यक्तीची पूर्ण शहानिशा केल्याशिवाय पुढे जाऊ नका. एखादा चुकीचा निर्णय नुकसानकारक ठरू शकतो. जुन्या लोकांवरदेखील पटकन विश्वास ठेवू नका. ( गणेश उपासना उत्तम ठरेल.) 

No comments: