Showing posts with label शास्त्री अभ्यास. Show all posts
Showing posts with label शास्त्री अभ्यास. Show all posts

Friday, June 12, 2020

लेखमालिका ५

लेखमालिका ५
मागील लेखात आपण १२ ग्रह , त्यांचे स्वामी कोणते?, राहू-केतु याबद्दल थोडी माहिती घेतली. आपणबघितले की पत्रिकेत १२ भाग असतात ते स्थिर आहेत , त्यात येणारे ग्रह आणि राशीमुळे प्रत्येक पत्रिका ही वेगळे भाकीत वर्तवणारी असते. हे (भाग ) भाव स्थिर म्हणजे काय; तर प्रत्येक पत्रिकेतील एखाद्या स्थानावरून ज्या गोष्टि पाहिल्या जातात त्या सरसकट सारख्या असतात, उदाहरणार्थ प्रत्येकच पत्रिकेतील प्रथम स्थानावरून त्या व्यक्तीच्या शारिरीक ठेवणीबद्दल आडाखा बांधला जातो, पंचम स्थानावरून प्रथम संततीचा विचार होतो किंवा जोड़ीदाराविषयी विचार करताना सप्तम स्थान बघतो वगैरे. नेमके कोणत्या स्थानावरून कशाकशाचा विचार होतो हे आता आपण पाहूया. त्या आधी खालील फोटोत पत्रिकेमधे हे भाव कशा क्रमाने येतात (anti clockwise) ते बघून घ्या.


इथे जे आकडे लिहिले आहेत ते भावांचे ( स्थानांचे) आहेत, राशींचे नाहीत हे लक्षात ठेवा. तुमच्या पत्रिकेत यापेक्षा कदाचित वेगळा क्रम तुम्हाला दिसेल; कारण त्यात राशींचे क्रमांक लिहिले आहेत जे आपण मागील लेखात पहिले. आता प्रत्येक भावावरून काय पाहतात हे बघूया.
१) प्रथम भाव :- याला ' लग्न' भाव म्हणतात. कोणत्याही घटनांचा विचार करताना हा भाव विचारात घेतात. या भावावरुन जातकाची वैचारीक / बौद्धिक पातळी, स्वभाव गुणदोष, मनाचा कल, आरोग्य, आयुर्दाय, चरित्र, नेतृत्व, प्रयत्नातील यशापयश, दुसऱ्यावर पडणारी छाप पाहीली जाते. 

२) द्वितीय भाव :- द्वितीय स्थानावरुन डोळे, त्यांचे सौंदर्य/ दोष, तोंड- दात (म्हणून) खाण्यापिण्याची आवड पाहतात. वाणीचे स्थान असल्याने विचार प्रकट करण्याची क्षमता, आवाजातील माधुर्य / जरब, बोलण्याची पद्धत, गायन विद्या, वाचा-दोष, वक्तृत्व, (बोलण्याच्या कलेशी निगडीत व्यवसाय म्हणून) विक्रेते यांचा विचार होतो. कुटुंबस्थान असल्याने कौटुंबिक सौख्य, धनस्थान असल्याने स्वकष्टार्जित धन , किमती वस्तु, ज्यांचे रोख पैशात सहज रूपांतर करता येते अशा वस्तु, आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्था यांचा विचार होतो. 
द्वितीय विवाहाचा विचार या स्थानावरून होतो. पोशाख, निरीक्षण दृष्टि , स्मरणशक्ती व कल्पनाशक्तीचाही विचार होतो. 

३) तृतीय भाव :- कुंडलीतील या स्थानावरून जास्तीत जास्त बाबी पाहिल्या जातात. तृतीय स्थानावरून धैर्य- भित्रेपणा, मानसिक बैठक, आशा- निराशावाद, विशिष्ठ विषयाचा बौद्धिक कल, छोटे प्रवास, वास्तु बदलणे, नोकरीत बदली वगैरे. कोणतेही agreements, छापील / लिखित मजकूर, पत्रलेखन ते साहित्यलेखन सर्व प्रकार, मुलाखती, जामिन राहणे, लेखन साहित्य, प्रसिद्धि माध्यमे ( audio / video / printed) सर्व. All transport and communication medias.  वरील सर्व बाबींसंबंधी वस्तू तसेच नोकरी वा व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था, भाषातज्ञ, भाषांतरकार वगैरे या भावावरुन बघतात. शेजारी व त्यांचे सौख्य/ त्रास, लहान भावंडांपासून मिळणारे सुख-दु:ख या स्थानावरुन कळते. 

४) चतुर्थ भाव :-  यावरून आई, शिक्षण, घर, वाहन, जमिन, जागा, शेती यांचा विचार होतो. शिक्षण (प्राथमिक) त्याचा दर्जा वगैरे. सुखस्थान म्हटले जात असल्याने सर्व प्रकारची सुखसोयीची साधने उदा. फ्रिज, AC, mixer etc. वाहनौख्य, वाहनविषयक व्यवसाय, शेती व तत्संबंधी व्यवसाय, सर्व द्रव पदार्थ, पाण्याचे साठे हे पाहीले जाते. आयुष्यातील उत्तरार्ध हे स्थान दर्शवते. 

५) पंचम भाव :- संतती संबंधित सर्व काही. सर्व प्रकारच्या कला, गायन- वादन, करमणूक साधने (नाटक/ चित्रपट इ.) त्यातील कलाकार व त्या संबंधित सर्व साहीत्य. कला व्यवसाय म्हणून स्विकारणे वगैरे. 
प्रेमप्रकरणासंबंधी सर्व काही जसे प्रेमाचे स्वरूप, यशापयश, फसवणूक, विवाहबाह्य संबंध वगैरे. मैदानी खेळ व त्याचे साहित्य. फुलझाडे, नर्सरी, वैद्यकशास्त्र. पुर्व जन्माचे सुकृत, आध्यात्मिक साधना, शिष्य व लहान मुले, पाळणाघरे या साऱ्याशी निगडीत स्थाने व व्यवसाय. आरोग्याच्या दृष्टिने चांगले स्थान आहे. 

६) षष्ठ स्थान :- हे सर्वात उच्च दर्जाचे धनस्थान आहे. Bank balance, नोकरी, पगार, नोकरीचा कालावधी, व्यवहारातून मिळणारा लाभ, कर्ज, overdraft facility, उसने दिलेले पैसे मिळणे, परदेशाकइून कर्ज मिळणे इ., निवडणूका, Court cases, शर्यतीत विजय, स्पर्धा परिक्षेतील यश- अपयश, आजार- त्याचे स्वरूप, कालावधी, त्यामुळे येणारे व्यंग, साथीचे रोग, कामगार/ नोकर वर्ग, त्यांच्याकडून होणारे लाभ- हानी, कामगार संघटना, त्यांचे संप. शत्रु- त्याची ताकद. पाळीव प्राणी, त्यांच्याशी संबंधित जागा इ.
Pathology labs, catering-hotel/mess service etc., सफाई खाते याही गोष्टिंचा विचार या स्थानावरून होतो. पष्ठेश बलवान असल्यास एकच व्यवसाय पिढीजात असतो. हे मातुल घराण्याचे स्थान आहे त्यामुळे मामा मावशी यांचेकडून मिळणारे सुख इथून पाहतात.

पुढील लेखात आपण पुढील ६ भावांविषयी जाणून घेऊ.


Tuesday, June 9, 2020

लेखमालिका ४

नमस्कार!
मागील लेखांमधुन आपण पंचांगाची ५ अंगे कोणती? , पंचांग कसे वाचायचे हे पाहिले. आता पत्रिका म्हणजे काय ते पाहू.
पत्रिका म्हणजे काय ?
जातकाच्या जन्मवेळी , जन्मस्थळी तयार केलेला ग्रहस्थितीचा नकाशा.
आता तुम्हाला माहितीच असेल कि पत्रिकेत एकूण १२ भाग असतात. यातील प्रत्येक भाग ज्याला आम्ही " भाव" असे संबोधतो त्यावरून मानवी जीवनाशी निगडीत अशा गोष्टिंचा संबंध जोडलेला आहे. तर प्रत्येक पत्रिकेत हे १२ भाव, १२ ग्रह, आणि १२ राशी असतात. आधी आपण १२ राशी कोणत्या आणि त्यांचे स्वामी ग्रह कोणते हे बघू. खाली क्रमानुसार राशी आणि त्यासमोर त्यांचे स्वामी दिले आहेत.
१) मेष -- मंगळ
२) वृषभ - शुक्र
३) मिथुन - बुध
४) कर्क -- चंद्र
५) सिंह -- रवि
६) कन्या - बुध
७) तुळ -- शुक्र
८) वृश्चिक- मंगळ
९) धनु -- गुरु
१०) मकर - शनि
११) कुंभ -- शनि
१२) मीन -- गुरु 

आता राशी १२ आणि स्वामी ग्रह ७ आहेत. राहू , केतू , हर्षल , नेपच्यून , प्लुटो या ग्रहांना राशींचे स्वामीत्व नाही. राहू - केतू यांच्याकडे नक्षत्रांचे स्वामित्व मात्र आहे. राहू-केतू हे वास्तविक ग्रह नाहीत. ते छेदनबिंदू आहेत. म्हणजे चंद्र पृथ्वीभोवती आणि पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करते हे तर आपल्याला माहितीच आहे. या दोघांच्या भ्रमणकक्षा एकमेकांना जिथे छेदतात ते बिंदू म्हणजे राहू-केतू . अर्थात हे बिंदू भ्रमणकक्षेबरोबर स्वतःदेखील स्थान बदलतात, म्हणजेच हे चलित छेदनबिंदू आहेत. तर असे हे एका अर्थी काल्पनिक ग्रह असले तरी त्यांना पत्रिकेतील फलिताच्या दृष्टिने खूप महत्व आहे. हर्षल, नेपच्यून हे ग्रहदेखील फलिताच्या बाबतीत कलाटणी/ वेगळे वळण देणारे होतात असे म्हणल्यास चुकीचे ठरणार नाही. प्लुटो हा ग्रह सामाजिक जीवनावर परिणामकारक ठरतोच, वैयक्तिक पत्रिकेतही इतर ग्रहांबरोबरचे योग परिणाम करताना दिसतात.
आता या राशी-ग्रह-भाव यामधे आपण प्रथम भावांविषयी जाणून घेणार आहोत कारण भाव fix आहेत , त्यात नंतर आपण वेळ- स्थळ यांचा विचार करून रास आणि सर्वात शेवटी ग्रह मांडतो. तर पुढील लेखात १२ भावांवरून काय पाहिले जाते हे बघूया.
खाली आपली सूर्यमाला आणि राहू-केतूचा भ्रमणमार्ग असे फोटो तुमच्या माहितीकरता देत आहे.



ज्योतिषशास्त्री प्रज्ञा तिखे
केपी अभ्यासक


लेखमालिका ३

४)  योग :- 
२७ योग हे रवि व चंद्र यांच्या कुंडलीतील अंतरावर अवलंबून असतात. जेव्हा रवि व चंद्र यांच्या एकूण भोगांची बेरीज ८०० कला असते तेव्हा एक योग पूर्ण होतो. ८०० कला म्हणजेच १३°|२०' म्हणजेच दर १३ अंश २० कलानी एक योग तयार होतो. थोडक्यात रवि (आत्मा) व चंद्र (मन) आत्मा + मन यांच्या संयोगाने जीव जन्मतो असे आपण म्हणतो म्हणूनच पत्रिकेत जन्म कोणत्या योगावर झाला आहे हे महत्वाचे आहे. २७ योगांची नावे पुढीलप्रमाणे :-
१) विष्कंभ २) प्रीती ३) आयुष्मान ४) सौभाग्य ५) शोभन ६) अतिगंड ७) सुकर्मा ८) धृति ९) शूल १०) गंड  ११) वृद्धि १२) धृव १३) व्याघात १४) हर्षद १५) वज्र १६) सिद्धि १७) व्यतिपात १८) वरियान १९) परिघ २०) शिव २१) सिद्ध २२) साधय २३) शुभ २४) शुक्ल २५) ब्रह्मा २६) ऐंद्र २७) वैधृति.

जन्म कुंडलीत ज्या योगावर जन्म झाला आहे त्यावरून जातकाचे स्वभाव गुणधर्म , त्याची एकंदर वागणूक आपल्याला कळु शकते. २७ योगांपैकी ९ योग ज्योतिषीय दृष्ट्या अशुभ आहेत. ते पुढीलप्रमाणे :-
१)विष्कंभ २) अतिगंड ३) शुल ४) गंड ५) व्याघात ६) वज्र ७) व्यतिपात ८) परिघ ९) वैधृति

५) करण :-
“तिथ्यर्ध करणम् ।” तिथीचा अर्धा भाग म्हणजे करण. चंद्र १२ अंश गेल्यावर एक तिथी पूर्ण होते तर ६ अंश गेल्यावर एक करण होते. मुहूर्तशास्त्रात याचा वापर होतो. करणे २ प्रकारची असतात १) चर २) स्थिर
१) चर करणे :- १) बव २) बालव ३) कौलव ४)  तैतिल. ५) गरज ६) वणिज ७) विष्टी
यातील विष्टि करण हे सर्व कार्यास वर्ज्य आहे.
२)  स्थिर करणे :- कृष्ण चतुर्दशी च्या उत्तरार्धात शकुनी, अमावस्या पुर्वार्धात चतुष्पाद, उत्तरार्ध नाग करण आणि शुक्ल प्रतिपदा किंस्तुघ्न करण असे क्रमाने ही करणे येत असल्याने यांना स्थिर करणे म्हणतात. ही अशुभ करणे असल्याने शुभ कार्यास वर्ज्य आहेत.

आता पंचांगाची ५ अंगे कोणती हे आपल्याला कळलं, ते पंचांगात कसं पहायचं हे थोडक्यात बघू. खाली फोटो दिलाच आहे, त्यातील ५ जून चे पंचांग आपण वाचूया . वरिल आडव्या ओळीत संवत्सर नाम, उत्तरायण ग्रीष्मऋतु ज्येष्ठ शुक्लपक्ष अशी माहिती आहे. पहिला रकान्यात ति वा म्हणजे तिथी, वार (शुक्ल १५ म्हणजे पौर्णिमा) पुढे क मि  म्हणजे कलाक (तास) मिनिटे २४।४२ ही समाप्तीची वेळ असते. रात्री १२/४२ मिनिटांनी पौर्णिमा  संपून कृष्ण प्रतिपदा सुरु होईल. अनुराधा नक्षत्र १६ । ४३ म्हणजेच दु ४।४३ ला संपून पुढील ज्येष्ठा नक्षत्र सुरू होईल. याप्रमाणे पुढील योग, करण याचे रकाने वाचावेत. शेवटच्या मोठया रकान्यात त्या दिवसाची आणखी माहिती , कधी सुर्याचा नक्षत्रबदल असल्यास , काही व्रतांची माहीती असते.




टिप :- योगांविषयी अधिक माहिती माझ्या blog वरील ' शास्त्री अभ्यास ' या lable मधील माहीती वाचू शकाल.
पुढील लेखात पत्रिकेशी थेट संबंधित १२ राशी, ग्रह, भाव यांचा अभ्यास सुरु करू या.

या आधीचे लेख तसेच इतर ज्योतिषविषयक लेख वाचण्यासाठी follow करा https://pradnyaastro.blogspot.com

ज्योतिष शास्त्री प्रज्ञा तिखे
केपी अभ्यासक

Friday, June 5, 2020

लेखमालिका २

३) नक्षत्र :- न क्षरति तत् नक्षत्रः
नक्षत्र म्हणजे एक ठराविक तारकासमुह जो स्वतःच्या जागेपासून ढळत नाही. पृथ्वी गोल असल्याने आपल्याला हे तारकासमूह वेगवेगळ्या ठिकाणी दिसू शकतात पण ते त्यांच्या जागी स्थिरच असतात. चंद्र ज्या नक्षत्रात असतो त्या दिवशी ते नक्षत्र असते. तुमच्या पत्रिकेत चंद्र ज्या नक्षत्रात आणि चरणात असतो ते तुमचे जन्म नक्षत्र असते आणि ते ज्या राशीत येते ती तुमची रास असते. एकूण २७ नक्षत्रे आहेत. (खरंतर २८, अभिजित हे नक्षत्र मुहूर्त प्रकरणात विचारात घेतात. पण "राशीचक्रात" त्याचा विचार होत नाही.) एका नक्षत्राचे ४ भाग केले जातात ज्याला चरण असे म्हणतात. असे २७ नक्षत्रांचे एकूण १०८ भाग होतात. [ यावरून लक्षात येईल की नक्षत्र अभ्यास किती मोठा आहे ते.] हे १०८ भाग कसे असतात?त्यांचा कुंडलीत कसा उपयोग करतात? हे आपण पुढे पाहणार आहोत. आत्ता या २७ नक्षत्रांचे स्वामी कोणते ग्रह आहेत ते पाहूया म्हणजे तुमच्या पत्रिकेतला कोणत्या ग्रहाचा तुमच्या मानसिकतेवर अंमल आहे हे तुम्हाला पाहता येईल .




एका नक्षत्राचे ४ भाग करतात आणि एकूण नऊ भाग मिळुन एक रास तयार होते. खाली अवकहडा चक्राचा फोटो दिला आहे त्यावरून ही विभागणी तुमच्या लक्षात येईल. यातच प्रत्येक नक्षत्राचे दान, आराध्यवृक्ष, नाड, तत्व, संज्ञा अशी माहितीदेखील आहे. याचा फलिताच्या वेळी तसेच जातकाला उपाय सांगताना उपयोग केला जातो.


Thursday, June 4, 2020

लेखमालिका १

नवअभ्यासकांचे स्वागत !


मागील लेखात सांगितल्याप्रमाणे आपण हे शास्त्र जाणून घ्यायचा प्रयत्न सुरु करु या. 
ज्योतिष अभ्यासकांसाठी ‘पंचांग’ अतिशय महत्वाची पुस्तिका आहे. पंचांगाची ५ अंगे पुढील प्रमाणे १) तिथी २) वार ३) नक्षत्र ४) करण ५) योग 
याव्यतिरिक्तदेखील पंचांगात दर पानावर लग्नसमाप्ती कोष्टक, ग्रहांची क्रांती- योग, तसेच त्यांचे राशीतील अंश-कला- विकला थोडक्यात प्रत्येक ग्रहाची गती, नक्षत्र चरण समाप्ति, दिनविशेष आणि विवाह-मुंज आदी मुहूर्ताच्या तारखा हे असते. (हे सगळे आपण हळूहळू पुढे थोडे गणित शिकलो की मग पाहू.) तर आता प्रथम या पाच अंगांचा विचार करू या. त्यापुर्वी पंचांगाच्या मुखपृष्ठावर पहा. “स्वस्ति श्रीमनृपशालिवाहन शके १९४२ शार्वरिनाम संवत्सर” म्हणजे आपण शालिवाहन राजाने सुरु केलेले शक (कालमापन पद्धत) वापरतो. यात एकूण ६० संवत्सर आहेत. ६०वे संवत्सर संपले की पुन्हा पहिले सुरू होते. त्यातले आत्ता ३४वे शार्वरी संवत्सर चालू आहे. २०२१ च्या चैत्र प्रतिपदेला ( पाडव्याला) प्लव हे संवत्सर चालू होईल आणि त्याप्रमाणे दरवर्षी पुढचे. शेवटचे अक्षय संवत्सर झाले की पुन्हा पहिले प्रभवपासून पुढे सुरू होईल. प्रत्येक संवत्सराचे फल ( परिणाम) पंचांगात वर्णन केलेले असतात. ( खाली संवत्सरांच्या क्रमवार यादीचा फोटो दिला आहे. )
१) तिथी - मराठी वर्षाचे १२ महिने आपल्याला माहितच आहेत. हे म्हणजेच चांद्रमास. यात २ पक्ष/ पंधरवडे असतात. शुक्ल प्रतिपदा ते पौर्णिमा हे १५ दिवस म्हणजे शुक्ल पक्ष आणि त्यापुढचे अमावस्येपर्यंतचे १५ दिवस कृष्ण / वद्य पक्ष. चंद्र - सुर्य अगदी शेजारी असतात तेव्हा अमावस्या असते. या स्थितीपासूनद चंद्र १२ अंश पुढे गेला कि एक तिथी पूर्ण होते. चंद्राची दैनिक गती साधारणत: ११-१४ अंश असते. तिथींचे ५ प्रकार सांगितले आहेत. 
नंदा तिथी - १,६,११ आनंद देणाऱ्या तिथी
भद्रा तिथी - २,७,१२ कल्याणकारक तिथी
जया तिथी - ३,८,१३ जय देणाऱ्या तिथी
रिक्ता तिथी - ४,९,१४ रिक्त/ कमी करणाऱ्या तिथी ( या तिथी अशुभ असतात. आवर्जून चतुर्थीला शुभदिवस म्हणून वाहनखरेदी वगैरे केली जाते , त्यापेक्षा कर्ज फेडणे वगैरे करावे.)
पूर्णा तिथी - ५,१०,१५ या शुभ असतात. 
२) वार  - उदयात् उदयं वार: |
याचा अर्थ सुर्योदयापासून दुसऱ्या दिवशीचा सुर्योदय म्हणजे एक वार. जगात सगळीकडे वारांची नावे सारखी आहेत जी भारतीय गणितज्ञ आर्यभट्ट यांनी दिली आहेत. दिवसाच्या प्रत्येक तासावर पुन्हा विशिष्ठ ग्रहाचा अंमल असतो ज्याला होरा असं म्हणतात. सुर्योदयावेळी ज्या ग्रहाचा होरा असतो त्याचे नाव त्या दिवशीच्या वारास दिले जाते. हे होरे कसे ठरवले जाताात हे आपण ग्रहांची गती कशी असते हे पुढे पाहू त्यावेळी सांगेन. 




ज्योतिषशास्त्री प्रज्ञा तिखे
केपी अभ्यासक

Wednesday, June 3, 2020

लेखमालिका

नमस्कार ! 
‘ज्योतिष’ हा विषय अनेकांच्या जिव्हाळ्याचा असतो. कोणी ज्ञानाच्या आधारे शास्त्र म्हणून अभ्यास करेल, कोणाचा ‘निदान माझी पत्रिका मला कळली पाहीजे’ असा दृष्टिकोन असेल तर कोणीतरी मुलांचे विवाह गुणमेलन शिकून घेऊ असा विचार करत असेल. हे गूढ शास्त्र आहे त्यामुळे अनेकजण कुतूहलापोटी याकडे ओढले जातात असंही असेल. तर अशांसाठीच एक लेखमालिका लिहिण्याचा हा प्रयत्न. यात पंचांग , राशी-ग्रह- नक्षत्र-भाव याविषयी माहीती, पत्रिका कशी मांडतात, कशी वाचतात, बेसिक गणित याबद्दल step by step शिकू या. [पंचांग जवळ ठेवावे] काही वेळा गरज पडल्यास फोटो/ व्हिडिओ पोस्ट केले जातील. कोणाला यातील गणित विषयाची भीती म्हणून शिकत नसतील तर कोणी  ‘काहीतरी नको ते माहीती होईल’ या विचारानी लांब रहात असतील. पण हा अभ्यास खरंच काय असतो? किती असतो? याचा अंदाज घेऊ या. आठवड्यातून  दोन वार हे लेख येतील. आता You Tube च्या जमान्यात लेखमालिका कोण वाचणार असं नक्कीच वाटेल; पण आवश्यकता वाटल्यास तुम्ही हे लेख save करु शकाल . हा कोणताही अभ्यासक्रम नाही त्यामुळे परिक्षाही नाही, पण लिहीलेल्या लेखाबद्दल तुमचे प्रश्न/ शंका जरूर विचारू शकता. त्यासाठी मेसेंजर आहेच; पण “सुप्रभात/ शुभरात्री” करणाऱ्यांना ब्लाॅक केले जाईल. 
माझ्या blog वर देखील हे लेख उपलब्ध असतील, तो follow  करून एकत्रित लेख वाचता येतील. Blog Link - https://pradnyaastro.blogspot.com
ही पोस्टदेखील अर्थातच नावासकट शेअर करु शकता.    

ज्योतिषशास्त्री प्रज्ञा तिखे.   
केपी अभ्यासक

Sunday, May 24, 2020

परदेशातील कायमचे वास्तव्य

परदेशातील कायमचे वास्तव्य :-
परदेशगमनासाठी प्रामुख्याने ३, ७, ९, १२ या स्थानांचा विचार केला जातो. ही सर्व प्रवासाची स्थाने आहेत. तृतीय स्थान देशांतर्गत प्रवास दर्शवते. नवम स्थान दुरचे प्रवास, व्यय स्थान अतिदूरचे तर सप्तम स्थान हे दशमाचे दशम स्थान असल्याने उदयोग- व्यवसायानिमित्त केल्या जाणाऱ्या प्रवासासाठी विचारात घेतले जाते. परदेशातील दीर्घकाळ वास्तव्य व नागरिकत्व यासाठी व्यय व भाग्य स्थान बलवान असायला हवे. यासाठी कारक ग्रह गुरू , राहु व चंद्र यांचा विचार प्रमुख्याने होतो. शुक्र हा ग्रह विमान प्रवासाचा कारक मानला जातो. या ग्रहांचा गोचरीने कारक स्थानांशी संबंध येतो त्यावेळी परदेशगमनाचा योग येतो. परदेशातील कायमचे वास्तव्य अथवा तेथील नागरिकत्वाचे योग असणाऱ्या पत्रिकांमधे केंद्रातील राशी व ग्रहांचा ६, ८, १२ या स्थानांशी संबंध असतो. विशेषतः चतुर्थ स्थान जे मातृभूमी दर्शवते त्याचा व्यय स्थानाशी संबंध असतो. त्यांच्या अधिपतींच्या दशाकाळात जातकाचे परदेशात कायम वास्तव्य निश्चित होण्याकडे कल असतो. 


ज्योतिष शास्त्री प्रज्ञा तिखे.
स्व अभ्यास
शास्त्री परिक्षेस उपयुक्त.

Sunday, February 16, 2020

बीजक्षेत्र विचार

बीजक्षेत्र विचार -

कुंडलीमध्ये संततीसौख्याचा विचार पंचम स्थानावरून केला जातो. पण काही वेळेस पंचम स्थान बलवान असते, वरवर पाहता संतती योगही दिसतो पण संततीचा योग येत नाही. अशा वेळेस बीज व क्षेत्र विचार केला जातो. बीज म्हणजे पुरुषातील जीव धारणा करण्याची शक्ती , वीर्य तर क्षेत्र म्हणजे स्त्रीची गर्भधारणा शक्ती. पुरुष कुंडलीत शक्तीचा कारक रवि, वीर्याचा कारक शुक्र व संततीचा कारक गुरू यांचा विचार केला जातो.पुरुष कुंडलीत रवि + शुक्र + गुरु यांची राशी-अंश-कला यांची बेरिज करून जो बिंदू येतो त्यालाच बीज म्हणतात. बीज जर विषम राशीत व विषम नवमांशात असेल व शुभग्रह युक्त वा दृष्ट असेल तर बलवान असते. कुंडलीत बीज सम राशीत व विषम नवमांशात असेल अगर उलट असल्यास मध्यम बलवान असते. दोन्हीत सम राशीत असल्यास बीज दुर्बल असते.

स्त्री पत्रिकेत गर्भधारणा शक्तीचा कारक चंद्र , संततिकारक गुरु व रक्ताचा कारक मंगळ यांच्या राशी-अंश-कला यांची बेरिज करून जो बिंदू येतो त्यालाच क्षेत्र म्हणतात. ते जर सम राशीत व सम नवमांशात असेल तर गर्भधारणाशक्ती उत्तम असते. पण विषय राशीत असता निःसंतानता देतो. क्षेत्र बिंदूदेखील शुभग्रह युक्त वा दृष्ट असावा. पापग्रह मंगळ, शनि राहू, मांदी अगर नपुंसक ग्रहाजवळ नसावा. बीज व क्षेत्र वंध्या राशीत नसावे.  बीज व क्षेत्र बिंदूस सप्तवर्ग बलात पापराशी जास्त मिळाल्यास प्रसवफल निष्पत्ती होत नाही. 


ज्योतिष शास्त्री प्रज्ञा तिखे (संकलित) - कुंडलीची भाषा
' शास्त्री ' अभ्यासास उपयुक्त. 


Wednesday, February 12, 2020

वक्री ग्रह

वक्री ग्रह -
ग्रहांचे वक्रत्व हा वास्तविकतः एक आभास आहे. कोणताही ग्रह त्याच्या गतीने, त्याच्या कक्षेतुन सुयीभोवती भ्रमण करत असतो पण, पृथ्वीवरुन पाहणाऱ्याला , तिच्या स्वतःच्या गतीमुळे, प्रत्येक ग्रह वेगवेगळ्या राशीविभागासमोर दिसतो. कोणताही ग्रह एका राशीत असून तो पुन्हा मागे जात आहे असे दिसले म्हणजे तो वक्र होतो व त्या ग्रहाच्या गतीला वक्र गती म्हणतात .
शुभ ग्रह वक्री असता चांगली फले देतात. पाप ग्रह वकी असता चांगली फले देत नाही. बहिर्वती ग्रह रविपासून पुढे साधारण १४० अंश गेल्यावर त्यांची गती कमी होत जाऊन तो वक्री होतो. रविच्या ६- ७ - ८ स्थानातला ग्रह नेहमी वक्र स्थितीत असतो. मंत्रेश्वराने फलदिपीकेत वक्री ग्रहाची फार प्रशंसा केली आहे. बलामध्ये त्याला उच्च ग्रहाचा दर्जा दिला आहे. सारावलीकर यांचे मते शुभ ग्रह वक्र असता बलवान होतात व राजयोगासारखी फले देतात. परंतु पापग्रह वक्री असता जास्त त्रास, भ्रमंती, दुःख व अकारण प्रवास देतात. वक्र अवस्थेत ग्रहांचे किरण तेजस्वी होतात. वक्र ग्रह बलवान असतो तो संस्मरणीय फले दोन्ही तऱ्हेने देतो व ते कुंडलीतील ग्रहाची परिस्थिती, त्याचे स्वामी व इतर ग्रहांचे दृष्टियोग ह्यावर अवलंबून आहे. पाप गह वक्र असता चांगली फले देतो पण तो नीच नसावा. 
मंगळ- गुरु- शनि या ग्रहांचे वक्रत्व रविपासून पंचमात सुरु होते, ६-७-८ स्थानी ते वक्री असतात आणि नवमात ते संपते. गुरु - शनि दर वर्षी वक्र असतात. वक्रत्वानंतर स्तंभित्व हा मोठा भाग असतो. शनि वक्री व मार्गी होण्यापूर्वी ५-५ दिवस स्तंभी असतात. स्तंभत्व हा दुर्बल भाग आहे . स्तंभी काळात गोष्टी जशाच्या तशा राहतात. प्रगती होत नाही. ग्रह चांगल्या परिस्थितीत , स्वामित्वाने अगर दृष्टियोगाने शुभ असून वक्र असता अपूर्व फळे देतो. 
गोचरीमधे ग्रह वक्र होऊन दुसऱ्या स्थानात गेल्यावर त्या स्थानाची फले देतो. पाश्चिमात्यांच्या मते वक्रत्व हा ग्रहाचा दोष आहे पण हिंदू ज्योतिष्यांच्या मते वक्रत्व हे ग्रहाचे बलसाधन आहे व शुभही आहे. 
(संकलित) - कुंडलीची भाषा
' शास्त्री ' अभ्यासास उपयुक्त. 

Friday, February 7, 2020

पंचमहापुरुष योग

मंगळ, बुध , गुरु, शुक्र व शनि हे पाच ग्रह स्व अथवा उच्च राशीत केंद्रस्थानी असल्यामुळे जे योग होतात , त्यांची गणना पंचमहापुरूष योगात होते.
१) रुचक योग - मंगळ केंद्रात उच्च अगर स्वगृही असता हा योग होतो. शरीराने मजबूत, श्रीमंत , दिर्धायु, प्राचीन विद्येत निष्णात अशी या योगाची फले आहेत. मंगळाचे बलवत्ते वर या योगाचे महत्व अवलंबून आहे. हा एक राजयोग आहे. भाव व दशवर्गात मंगळ बलहीन असल्यास किंवा दृष्टि व युतीने दुषित असल्यास खरा रुचक योग होऊ शकत नाही, तो नाममात्र असतो.

२) भद्र योग - बुध ग्रहामुळे हा योग होतो. जातक विद्वान व धनवान होतो. या योगावर पापसंबंध व अस्तंगत दोष नसावा. 

३) हंस योग - पंचमहापुरूष  योगापैकी हंस योगावर गुरुची सत्ता आहे. लग्न वा चंद्रापासून गुरू केंद्रात स्व अथवा उच्च राशीत असता हंस योग होतो. जातक लोकप्रिय, नीतीमान,  धार्मिक असतो. 

४) मालव्य योग- शुक्र ग्रह केंद्रस्थानी स्व अथवा उच्च राशीत असल्यास मालव्य योग होतो. जातक श्रीमंत , संततीयुक्त, कीर्तीवान होतो. कौटुंबिक सुबत्ता व वाहनयोग असतो.

५) शशयोग - शनि ग्रहामुळे हा योग होतो. पैसा भरपूर मिळतो पण तरीही जातकाची दुसऱ्याच्या पैशावर नजर असते. 
पंचमहापुरुष योगामधील जास्तीत जास्त चार ग्रहांचे योग पत्रिकेत आढळू शकतात. जास्तीत जास्त योग असणे हे राजयोगाची फले देतात. 

Wednesday, January 22, 2020

बालारिष्ट योग

बालारिष्ट योग-

आयुर्दाय पाहताना लग्नस्थान, लग्नेश यांचा रोगप्रतिकारशक्ती, आरोग्य, स्वभाव या दृष्टिकोनातून विचार केला जातो. आरोग्याचा कारक ग्रह रवि, मनाचा कारक ग्रह चंद्र, अष्टमस्थान व अष्टमेश तसेच आयुष्य / मृत्यू याचा कारक ग्रह शनि यांचा विचार केला जातो. या सर्वापैकी जास्तीत जास्त गोष्टी बलवान असता चांगला आयुर्दाय लाभू शकतो. ज्या प्रमाणात बिघाड झाला असेल त्या प्रमाणात आयुर्दाय कमी होणे अथवा गंडांतर येणे या गोष्टी होऊ शकतात. वरील ग्रह जेव्हा राशी गंडांत, नक्षत्र गंडांत (म्हणजेच कर्क - सिंह संधी, आश्लेषा- मधा नक्षत्र संधी, वृश्चिक - धनु संधी, ज्येष्ठा मुळ नक्षत्र संधी व मीन- मेष संधी, रेवती अश्विनी नक्षत्र संधी या भागात असतात ) तसेच तिथी गंडांत मध्ये जन्म असल्यास (म्हणजेच पंचमी- षष्ठी, दशमी- एकादशी आणि पौर्णिमा/ अमावस्या व प्रतिपदा असता ) मृत्यूसारखी स्थिती उद्भवू शकते.  वय वर्षे १२ पर्यंत मृत्यू अथवा गंडांतर येणे, पत्रिकेत चंद्र ग्रहणयुक्त (राहू-केतूने युक्त) अथवा पाप ग्रहांनी युक्त किंवा दृष्ट असेल तर बालारिष्ट योग संभवतो. चंद्र बलहीन असता वयाच्या १२ वर्षेपर्यंत गंडांतर येण्याची शक्यता असते. जेव्हा आयुर्दायाचा विचार केला जातो त्यावेळेस प्रथम बालारिष्ट योगाचा व त्यानंतर अल्पायु, मध्यायु, दिर्घायु व  पुर्णायु अशा टप्प्यात केला जातो.


Sunday, July 21, 2019

२७ योग
२७ योग हे रवि व चंद्र यांच्या कुंडलीतील अंतरावर अवलंबून असतात. जेव्हा रवि व चंद्र यांच्या एकूण भोगांची बेरीज ८०० कला असते तेव्हा एक योग पूर्ण होतो. ८०० कला म्हणजेच १३°|२०' म्हणजेच दर १३ अंश २० कलानी एक योग तयार होतो. थोडक्यात रवि (आत्मा) व चंद्र (मन) आत्मा + मन यांच्या संयोगाने जीव जन्मतो असे आपण म्हणतो म्हणूनच पत्रिकेत जन्म कोणत्या योगावर झाला आहे हे महत्वाचे आहे. २७ योगांची नावे पुढीलप्रमाणे :-
१) विष्कंभ २) प्रीती ३) आयुष्मान ४) सौभाग्य ५) शोभन ६) अतिगंड ७) सुकर्मा ८) धृति ९) शूल १०) गंड  ११) वृद्धि १२) धृव १३) व्याघात १४) हर्षद १५) वज्र १६) सिद्धि १७) व्यतिपात १८) वरियान १९) परिघ २०) शिव २१) सिद्ध २२) साधय २३) शुभ २४) शुक्ल २५) ब्रह्मा २६) ऐंद्र २७) वैधृति.
जन्म कुंडलीत ज्या योगावर जन्म झाला आहे त्यावरून जातकाचे स्वभाव गुणधर्म , त्याची एकंदर वागणूक आपल्याला कळु शकते. २७ योगांपैकी ९ योग ज्योतिषीय दृष्ट्या अशुभ आहेत. ते पुढीलप्रमाणे :-
१)विष्कंभ २) अतिगंड ३) शुल ४) गंड ५) व्याघात ६) वज्र ७) व्यतिपात ८) परिघ ९) वैधृति
गणिताने योग सिध्द करण्याकरता पुढील रीत वापरावी.
(स्पष्ट चंद्र + स्पष्ट रवि ) एकूण भोग कला ÷ ८०० कला.
आता योगांची माहिती पाहू.
१) विष्कंभ :-  ००°_ १३°|२०'
हा अशुभ योग आहे. याचा अर्थ विषाचा कुंभ. जरी हा योग अशुभ असला तरी या योगावरील जातक शत्रूवर विजय मिळवणारा, बुद्धिमान,  धनवान , स्थावर मालमत्ता मिळवणारा असतो. त्याचे व्यक्तिमत्त्व लोभस असते व परिवारातील लाडका सदस्य असतो. कौशल्यपूर्ण कामे करण्यात निपुण असतो. या जातकाला कधी आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत नाही व यांना कौटुंबिक सौख्यहि उत्तम लाभते. समाजात यांचा प्रभाव असतो. पण या योगावर कोणतीही शुभ कार्ये करु नयेत.
२) प्रीती :- १३°|२०' - २६°|४०'
हा शुभ योग आहे. नावावरूनच कळते कि या योगावर जन्मणाऱ्या व्यक्ती दिलदार स्वभावाच्या, मनमिळाऊ व आनंदी असतात. यांना प्रवासाची आवड असते. वक्तृत्व उत्तम असते. विरूध्दलिंगी व्य्क्तींबरोबर नम्र व्यवहार असतो. जोडीदाराबरोबर खूप चांगले नाते असते.  बुद्धिने चलाख असतात व यश कसे मिळवायचे याची पुरेपुर जाण असते. एखाद्या कार्यासाठी झोकून देण्याची तयारी असते. आनंदी आयुष्य जगतात.
३) आयुष्मान :- २६°|४०' - ४०°|००'
या  योगावर जन्मणाऱ्या व्यक्तिंमधील उत्तम नेतृत्वगुणामुळे ते यशस्वी होतात. ते दिर्घायु असतात. त्यांचे निर्णय सहसा चुकत नाहीत व ते सर्वमान्य असतात. उत्तम संस्कार व संस्कृती जपणारे असतात. त्यांची कष्ट करण्याची तयारी असते व कष्टाचे फळही उपभोगतात. यांना ललित कलांची आवड असते. धनवान असतात. शरीराने मजबूत व शत्रूवर मात करणारे असतात.
४) सौभाग्य :- ४०°|००' - ५३°|२०'
नावाप्रमाणेच हा शुभ आहे. या योगावरील जातकांचे बोलणे सकारात्मक व लाघवी असते. अतिशय बुद्धिमान असतात. पैसा चांगल्या मार्गाने मिळवतात. लोकांकडून यांच्या गुणांचे कौतुक होते व यांच्यात अनेक उपजत गुण असतात. सुगंधी वस्तूंची आवड असते. विरूध्द लिंगी व सुंदर व्यक्तिंचे आकर्षण असते. केटरिंगच्या व्यवसायात तसेच भागीदारीत केलेल्या व्यवसायात उत्पन्न असू शकते. घरापासून दूर वास्तव्य करु शकतात.
५) शोभन :- ५३°|२०' - ६६°|४०'
या योगावरिल जातक उत्तम बुद्धी , नीती व शुद्ध भावनेचे असतात. पण इतरांच्या चुकीच्या वागण्याचा खूप त्रास करून घेतात. जबाबदारी घेण्याची आवड असते व ती नीट पार पाडतात. यांचा जोडीदार आकर्षक व गुणवान असतो. हे थोडे आक्रमक स्वभावाचे असतात. पुत्रसंतती अधिक व संततीसौख्य उत्तम. कलात्मकतेची व अन्नपदार्थांची आवड असते. व्यवसायात यशस्वी ठरतात.
६) अतिगंड :- ६६°|४०' - ८०°|००'
हा अशुभ योग आहे. या योगाच्या जातकांना चित्रपट, संगीत, कलेची आवड असते. लोकांच्या भांडणात रस असतो . अतिशय कणखर मनाचे व धैर्यशाली असल्यामुळे सहसा कोणाच्या प्रभावाखाली रहात नाहीत. थोडे बाहेरख्याली स्वभावाचे असतात. मातेस त्रास होऊ शकतो. घराण्याला बट्टा लागेल अशी कृत्य यांच्याकडून होण्याची शक्यता.
७) सुकर्मा :- ८०°|००' - ९३°|२०'
या योगावरील जातक धनवान, नीतीमान , जबाबदार असतो. व्यावहारिक पण लोभी वृत्तीचा असु शकतो. धार्मिक गोष्टींची आवड असणारा, इतरांचा कळवळा असतो. यांच्या वागणुकिमुळे ते इतरांवर स्वतःची छाप पाडतात.
८) धृति :- ९३°|२०' - १०६°|४०'
विज्ञानाची आवड असते. अवकाश तंत्रज्ञानात रस असतो. कणखर मनाचे व स्वतःच्या मनाचा थांग न लागु देणारे असतात. सुगंधी द्रव्यांची आवड असते. वृत्ती बाहेरख्याली. योग्य विचार करून निर्णय घेतात. कौटुंबिक सौख्य लाभते व यशस्वी होतात.
९) शूल :- १०६°|४०' - १२०°|००'
हा अशुभ योग मानला जातो. या योगावर जन्मणारे जातक सत्यप्रिय व सत्कर्मी असतात. गुणवान व सुदैवी असतात. शारीरिक ठेवण लवचिक असते. उच्च विचार व चपळ असतात. ते धार्मिक गोष्टींमधे खूप ज्ञान मिळवतात पण नशीबाने पैसाहि मिळत असतो त्यामुळे इतर भौतिक इच्छाहि पूर्ण करतात. जरी असे अनेक गुण व सुखी क्षण असले तरी या योगाच्या अशुभत्वामुळे त्यांना कसलेतरी दु:ख असते. शारीरिक यातना भोगाव्या लागतात.
१०) गंड :-  १२०°|००' - १३३°|२०'
हा अशुभ योग आहे. या योगावरील जातकांचा बांधा मध्यम असतो. यांचा स्वभाव अति बडबडा, सत्यप्रिय व अभिमानी असतो. हे यांच्या तब्येतीची जास्त काळजी घेतात. यांना समाजातील वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो यामुळे सुरुवातीला मानहानी, मनस्ताप यातून त्रास होतो; पण ते स्वतःच्या इच्छाशक्तीवर व कार्यतत्परतेमुळे त्यातून स्वतःला बचावतात. शारीरिक त्रास होण्याची शक्यता.
११) वृद्धी :- १३३°|२०' - १४६°|४०'
यांच्यातील सारासार विचारबुद्धी वाखाणण्याजोगी असते. कुटुंबावर प्रेम करतात व तीच त्यांच्यासाठी खरी संपत्ती असते. यांना मिळणाऱ्या संधीवर व त्यांच्यावर झालेल्या संस्कारांमुळेच ते प्रगती करतात. या योगाचा प्रभाव हा फक्त जातकावरच नाही तर त्याच्या कुटुंबावर, संततीवर देखील दिसतो. यांची शारीरिक ठेवण बांधेसूद व आकर्षक असते. बोलणे ठाम व शुद्ध उच्चार असतात.
१२) धृव :- १४६°| ४०' - १६०°|००'
यांचा स्वभाव शांत, संयमी असतो. काही वेळेस अपवित्र व दुष्ट विचार/ कृती करण्याकडे कल दिसतो पण शत्रूवर मात करतात. बोलणे ठाम व बुद्धिवादी असते. समाजातील सर्व स्तराकडुन यांना प्रेम मिळते. आपल्या स्वभावाने सर्वांना जिंकून घेतात.
१३) व्याघात :-  १६०°|००' - १७३°|२०'
हा अशुभ योग आहे. या योगावर जन्म असणाऱ्या व्यक्तींची रहाणी अस्वच्छ असते. चौर्य कर्म करणे, क्रूरपणे वागणे- बोलणे याकडे कल असतो. स्वभाव तापट व विक्षिप्त असतो. यामुळे यांचे शत्रू अधिक असतात. यांचा गुण म्हणजे एखादे काम ते स्वतःला पूर्णपणे झोकून देउन करतात. त्यांचा अनेक कौशल्यपूर्ण कामांमधे हातखंडा असू शकतो. याच गुणाच्या जोरावर ते प्रसिद्धी मिळवतात व जीवनात यशस्वी होतात.
१४) हर्षण :- १७३°|२०' - १८६°|४०'
ज्योतिषीय दृष्ट्या हा अतिशय शुभ योग आहे. या योगावरिल जातक अतिशय सुदैवी असतो. खुप सुखी व आनंदी आयुष्य यांना लाभते. सर्व शास्त्र व कलांमधे निपुण असतात. जातक बुद्धिमान व गुणवान असतो. समाजाकडून यांच्या गुणांची कदर होते व मानमरातब मिळतो.
१५) वज्र :- १८६°|४०' - २००°|००'
हा अशुभ योग आहे. या योगावरिल जातक स्वार्थी, धनवान पण कंजूस व क्रूर असतो. बोलणे गावंढळ असते. पापाचरणाकडे कल असतो. या योगाच्या गुणधर्माला अनुसरून या जातकाच्या विशेषत: बाहूंमधे बल असते. यांचा शारीरिक जोम व ताकदीमुळे यांना शारीरिक कष्टाची कामे सहज जमतात. धैर्यवान असतात व शस्त्र हाताळण्यात वाकबगार असतात. तसेच एखाद्या गोष्टीतील त्रूटी पटकन लक्षात घेतात त्यामुळे देखरेखीची कामे उत्तम करतात. यांनी इतरांच्या सकारात्मक बाजूकडे पहाणे गरजेचे असते.
१६) सिध्दि :- २००°|००' - २१३°|२०'
या योगावरिल जातकास सर्व सुखांचा उपभोग घेता येतो. धनवान, गुणवान असतात. कोणत्याही क्षेत्रात उत्तम यश मिळवतात. वृत्ती त्यागी असते. स्वतःची कामे कौशल्यपूर्णतेने करण्याच्या प्रयत्नात असतात. सामाजिक जाणीव उत्तम असल्याने गोरगरिबांना आर्थिक मदत करणे यासारखी दानधर्माची कामे करतात. तरी या जातकांना शारीरिक त्रास भोगावा लागण्याची शक्यता असते.
१७) व्यतिपात :- २१३°|२०' - २२६°|४०'
हा अशुभ योग आहे. यांना प्रत्येक कामात सतत अडथळे येतात व अपयशाचा सामना करावा लागतो. पण अपयशाने खचून न जाता त्यातून मार्ग काढण्याची यांची वृत्ती असते. सतत अडथळे आल्यानेयांचा स्वभाव थोडा क्रूरतेकडे झुकणारा होऊ शकतो. लहानपणीच त्यांच्यावर अनेक प्रसंग येतात पण तारुण्यात त्यांना हवे तसे यश मिळवतात व आनंदी राहतात.
१८) वरियान :- २२६°|४०' - २४०°|००'
या व्यक्ती इतरांच्या आयुष्यात आनंद आणतात. हा योग जातकाला आदर, पैसा मिळवून देतो. वृत्ती बढाईखोर असते. ललितकलांमध्ये स्वारस्य असते. सृजनशक्ती असते. या क्षेत्रात लवकर यशस्वी होतात. हा योग जातकास वरच्या पदावर नेणारा आहे. धर्मावर विश्वास असतो. यांच्या धैर्य व आत्मविश्वास या गुणांमुळे शत्रूच्याही मनात आदर निर्माण होईल. व्यावसायिक भागीदारालाही यांचा अभिमान असतो. पण तो कदाचित कधी व्यक्त होत नाही. धनसंपत्तीचा उपभोग घेतात.
१९) परीघ :- २४०°|००' - २५३°|२०'
हा अशुभ योग आहे. या योगावरिल जातक थोडे कद्रू स्वभावाचे, दुतोंडी , लोभी व हीन गुणी असतात. पण योगाच्या नावाप्रमाणे यांच्या ज्ञानाचा व्यासंग मात्र मोठा असतो. अध्यापन क्षेत्रात चांगला दर्जा मिळवतात. यांना साहसी, मर्दानी खेळांची आवड असते. यांना विविध विषयातील ज्ञान असते व त्यायोगे स्वतःचे व घराण्याचे नाव मोठे करतात. मृदुभाषी व प्रेमळ असतात. कौटुंबिक सौख्य लाभते.
२०) शिव :-  २५३°|२०' - २६६°|४०'
या योगावरिल जातक सात्विक, धार्मिक, तीर्थयात्रा करण्याची आवड असणारा, पुत्रसौख्य व धनसंपदा लाभते. या लोकांना भौतिक सुखात रस नसतो. पण ते निस्वार्थीपणे लोकोपयोगी कामे करतात व त्यांना समाजात मानमान्यता मिळते. शुद्ध मनाचे असतात.
२१) सिद्ध :- २६६°|४०'- २८०°|००'
या योगावरिल जातक गुप्त सल्लागार, व्यवहारकुशल व निर्मळ मनाचे असतात. या जातकांचा तंत्र- मंत्र शास्त्रावर विश्वास असतो व त्याचा ते वापर करण्यास उत्सुक असतात. विज्ञान , तत्वज्ञान, साहित्य यात यांना रुची असते. यांचा जोडीदार आकर्षक व बुद्धिमान असतो. कोणत्याही कामामागे यांचा शुद्ध हेतू असतो व त्यांना त्यांच्या चांगल्या कामांसाठी आपोआपच प्रसिद्धी मिळते.
२२) साध्य :- २८०°|००' - २९३°|२०'
या योगावर जन्मणारे जातक त्यांच्या विषयात उत्तम ज्ञान असते व कर्तव्यबुद्धीने वागणारे असतात. पण इतर लोकांच्या मनात यांच्याविषयी आकस असतो. ते अतिशय विश्वासू, हुशार व खुल्या मनाचे असतात. नवनवीन कल्पनांचा स्वीकार करतात. यांना संगीत, ललित कलांमधे रुची असते. बुद्धि निश्च्यात्म्क असते व आत्मविश्वास असतो. संयम हा त्यांचा मुख्य गुण आहे. स्वतः प्रयत्नपूर्वक केलेल्या कामांचे योग्य फळ मिळण्याची वाट पाहण्याची तयारी असते. पूर्ण विचार करून निर्णय घेतात.
२३) शुभ :- २९३°|२०' - ३०६°|४०'
या व्यक्ती प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या व समाजाकडून आदर मिळवणाऱ्या असतात. सुदैवी, धर्माने वागणारे, सत्यवादी, व शुद्ध मनाचे असतात. सहसा न चिडणारे व नम्र स्वभावामुळे सर्वांचे लाडके असतात. कामाच्या ठिकाणी स्वतःची गुणवत्ता सिध्द करतात. नावाप्रमाणेच हा योग अतिशय शुभ आहे. यांना कधीही पैशाची ददात रहात नाही. संत - साधु मंडळीचा आशिर्वाद लाभतो.
२४) शुक्ल :- ३०६°|४०' - ३२०°|००'
या योगावर जन्मणारे जातक खुप सत्यवादी, बुद्धिमान, सुंदर व प्रसिद्ध असतात. यांना धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करणे आवडते व ललित कलांमध्येहि गती असते. कलेच्या कोणत्याही आविष्कारात हे पारंगत होऊ शकतात. यांना कवित्वाची आवड असते व स्वतः उत्तम कवि असतात. शिक्षणात रस असतो. सधन असतात. स्वतःच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाने लोकांवर छाप पाडतात.
२५) ब्रह्म :- ३२०°|००' - ३३३°|२०' 
हा योग जातकासाठी अतिशय शुभ आहे. यांची देवावर प्रचंड श्रद्धा असते. पवित्र धर्मग्रंथांचे ज्ञान होण्यासाठी प्रयत्न असतो. विद्वान लोकांशी मैत्री असते. बळकट व धैर्यशील वृत्तीचे असतात. वेद- उपनिषदांचा अभ्यास करतात. सर्वमान्य असे भाषण करतात. हठयोगद्वारे साधना करु शकतात. समाजात प्रेम व आदर मिळवतात.     
२६) इंद्र :- ३३३°|२०' - ३४६°|४०'
    या योगावरील जातक नि:स्वार्थी, अतिशय धनवान, व सुदैवी असतात. ते यशस्वी, अधिकारी व प्रत्येक कर्तव्य उत्कृष्टपणे पार पाडणारे असतात. कौटुंबिक सौख्य उत्तम मिळते. व्यवहार कुशलतेने पार पाडतात. पण या योगाची अशुभ बाजु म्हणजे जातकाची आयुर्मर्यादा कमी असते.
२७) वैधृति :- ३४६°|४०' - ३६०°|००'
हा अशुभ योग आहे. या योगावरिल जातक लोभी, अतिशय बडबड्या स्वभावाचे व आयुष्यातील सुरुवातीची काही वर्षे द्विधा मन:स्थितीचे असतात. पण हे लोक उत्साही व सकारात्मक असतात. हाती घेतलेले काम खिलाडूवृत्तीने पूर्ण करतात. इतरांना मदत करण्याची तयारी असते. आधुनिक जीवनशैलीची आवड असते. यांचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन इतरांपेक्षा वेगळा असतो.