Thursday, December 20, 2018

असंच..... थोडसं लहानपणचं.


आपण प्रत्येकजण लहानपणीच्या आठवणीत खूप रमून जातो. माझी आई आणि सासूबाईसुद्धा त्यांचं काही सांगताना त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसते अजूनही. मी लगेच कल्पना करते कि मी सुद्धा असंच सगळं रंगवून सांगेन माझ्या पुढच्या पिढीला, पण मग वाटलं हे खूप natural असावं. आज म्हणलं तुमच्या बरोबर थोड्या आठवणी share कराव्यात.
तसं आपलं सगळ्यांचं बालपण भावंडांशी भांडणं- मारामारी करण्यात किंवा त्यांच्या खोड्या सांगून कुरापती काढण्यात गेलं. तसंच माझंही. पण काही गमती अशा असतात की त्या फक्त आपल्या असतात. तशाच सांगते थोड्याशा. मी आमच्या घरात धाकटी. मोठ्या दोघी बहिणी दिवसभर शाळेत, आई-बाबाचं ऑफिस. मला एकटं वाटेल म्हणून माझी एक काकू यायची दिवसभर. खूप छान सोबत व्हायची मला. एक महत्वाचं काम तिनी असं केलं की, मला वाचनाची आवड लावली. चांदोबा, अनमोल गोष्टी, आणि अजून इतर बरीच. त्या गोष्टींमध्ये काही वेळा छोट्या मुलांना एक सावत्र आई असायची; ती त्यांचा खूप छळ करायची, त्यांना उपाशी ठेवायची. मला फार वाईट वाटायचं त्या मुलांसाठी. मी तेव्हा मनाशी पक्कं ठरवलं कि आपल्याला सावत्र मुलं असली तरी आपण त्यांच्याशी प्रेमानी वागायचं. सावत्र म्हणजे प्रेम न करणारी एवढाच अर्थ होता माझ्या लेखी. मग एकदा एका गोष्टीत आलं कि , सावत्र असूनही ती आई मुलांवर प्रेम करायची. ते वाचून थोडा गोंधळ उडाला माझ्या मनाचा.... पण मग मी विचार केला, हि असेल आपल्यासारखी.
अजून असंच त्या पुस्तकांमध्ये अशा गोष्टी असायच्या कि शेतकऱ्याला, सावकाराला तीन मुलगे किंवा सुना असायच्या. वाटणी करायची असली कि तो त्यांची परीक्षा घ्यायचा. नेहमी धाकटी सून/ मुलगाच योग्य ते काम करायचे. आमच्याकडे मी धाकटी. आम्ही तिघी बहिणी. या गोष्टी वाचून मला माझ्या धाकटेपणाचा खूप अभिमान वाटायचा. काहीही असू दे, धाकटे आहोत म्हणजे आपणच कर्तुत्व गाजवणार असंच वाटत राहिलं. पुढे शाळेत अभ्यास वाढत गेला तसं आपण अपवाद आहोत या गोष्टींना हे कळत गेलं.
एक शाळेचीच आठवण सांगते. गणित विषय बऱ्याचजणाना अवघड वाटतो, तसाच मलाही. बेरीज ते भागाकार इथपर्यंत ठीक होतं; पण पुढे अपुर्णांक, वर्गमूळ, चक्रवाढ व्याज या गोष्टी माझा घात करणाऱ्या होत्या. पुन्हा ते एवढा हौद भरायला किती वेळ लागेल याचं उत्तर काही शेकडा तास असं यायचं. (मिनिटांचे तास करायला विसरायचे.) एकदा ठराविक भिंत बांधायला किती मजूर लागतील? याचं उत्तर साडेनऊ आलं होतं माझं. बाई म्हणाल्या, “असं कसं होईल सांग बरं!” मी म्हणाले, “दहाव्या मजुरानी अर्धवेळ काम केलं.” त्यावर त्यांनी माझ्याकडे ज्या नजरेनी पाहीलं ते अजूनही आठवतं. त्या अगदी हाडाच्या का कसल्या शिक्षिका होत्या. मला म्हणाल्या, “पुन्हा प्रयत्न कर. कदाचित वेगळं उत्तर येईल.” मी पण केला खूप प्रयत्न, पण मला काही पूर्णवेळ काम करणारे मजूर मिळाले नाहीत.
आज या आणि अजून बऱ्याच आठवणी आवर्जून सांगते मुलांना. जाम मजा येते जेव्हा मी सांगत असलेलं त्यांच्या डोळ्यासमोर येतंय हे दिसतं. आठवणींचा खजिना जेव्हा उघडला जातो तेव्हा नुसतच तिथे रमून जाणं नसतं, तिथे आपण कसे घडलो, याचं एक वेगळं भान असतं. आपण अनुभवलेल्या या भावनांना बघण्याचा आजच्या मुलांचा दृष्टीकोन कुठेही बाधक नसतो. ते सुद्धा तितकाच निरागस विचार करतात. आपणच त्यांना शेवटी मोठं आणि शहाणं करण्याच्या नादात जबाबदार आणि व्यवहारी बनवतो. अर्थात ते हवंच. त्याशिवाय त्यांच्याकडे असा खजिना कसा तयार होणार, नाही का?

No comments: