श्रद्धेचं टायटॅनिक
आज खूप दिवसांनी अगदी निवांत वेळ मिळाला. कधीच
टी.व्ही.चा रिमोट माझ्या हाती लागत नाही. आज चक्क तोही मिळाला. जरा म्हणलं आरामात
बघत बसावं पण तेवढ्यात मुलाच्या हातात गेलाच रिमोट. पण तो टायटॅनिक लावून बसला.
माझा आवडता चित्रपट. लिओनार्डो सारखा हिरो आणि केंट विन्स्लेट तर अप्रतिम. मुळात
याची कथा ज्या पद्धतीने आपल्यासमोर उलगडत जाते त्याबद्दल लेखकाच्या सादरीकरणाचे मला
फार कौतुक वाटले पहिल्यांदा पाहताना. आणि आजहि जेव्हा बघते तेव्हा सगळ्याच
चित्रीकरणात रमून जाते मी. निसर्गाचं रौद्ररूप, स्वत:च्या भव्यतेचा माणसाला
वाटणारा गर्व पण नंतर जाणवणारी हतबलता, आणि या साऱ्यात त्याची न संपणारी आशा........
हे खूपच सुंदर चित्रित केलंय. मी सिनेमा
पाहण्यात अगदी गढून गेले होते. जहाजाचे दोन तुकडे होण्याच्या बेतात असतात; लोक
वरच्या बाजूकडे धाव घेत असतात, तो प्रसंग चालू होता. त्यातही काही लोक बोटीवरील
एका माणसाचा हात धरून बायबलचा उतारा म्हणत असतात. मी खूप भावूक होऊन बघत होते आणि तेवढ्यात
मुलगा म्हणाला “काय वेडी माणसं आहेत, जीव वाचवायचा सोडून प्रार्थना करत बसली
आहेत.” मी सहजच म्हणल , “अरे श्रद्धा असते ना.” तो म्हणाला, “असली श्रद्धा काय
कामाची? स्वतः काही न करता देव-देव करून काम होतात का? मुळात देवच नसतो.” त्याच्या
अडनिड्या वयाला सुलभ असाच तो बोलत होता. पण हे ऐकल्यावर लक्षात आलं .... हीच ती
वेळ ,हाच तो क्षण, संस्कार घडवण्याचा. आमच्या संवादाला सुरुवात झाली.
“का वाटतं देव नाही असं ?
फक्त दिसत नाही म्हणून ना? पण मग हवाही नाही दिसत...
“हो, पण जाणवते ना...”
“तसाच देव ही
जाणवतो,अनुभवावा लागतो. आज इतक्या अनंत गोष्टी आहेत आपल्या अवतीभवती , त्यांना निर्माण
करणारा कुणीतरी असणारच ना?”
“हो. पण शास्त्रज्ञांनी सिद्ध केलंय कि ही पृथ्वी , इतर ग्रह कसे
तयार झाले. आणि फक्त आपली सूर्यमाला नाहीये. इतरही अनेक आहेत
आपल्यासारख्याच.त्यांचा शोध लावायचा आहे आता. सगळं काही वातावरणात जे वेगवेगळे
वायू आहेत त्यांच्यातल्या बदलांमुळे होतंय, देवानी नाही केलं.”
“बरं, ठीक आहे. पण तरी वायू
कोणामुळे निर्माण झाले? त्यांच्यात बदल का आणि कोणाच्या इच्छेने होतात असे अनेक
प्रश्न निघतील. मुळात हे तरी मान्य करुया कि अनेक गोष्टी आहेत ज्या मानवनिर्मित
नाहीत; आणि मग त्या ज्या शक्तीमुळे तयार झाल्या आहेत ती शक्ती म्हणजे देव.”(माझा
हा युक्तिवाद पटला युवराजांना !)
“हं. देव म्हणजे ती शक्ती
हे चालेल; पण मग राम-कृष्ण वगैरे नव्हते बर का?” (गाडी आसमंत फिरून देवाच्या
अवतारांच्या स्टेशनमध्ये आली होती.)
“बरोबर. अवतार नव्हते कबूल
करू. पण त्यांना देवाची सांकेतिक रूपं म्हणून पाहायला काय हरकत आहे?”
"म्हणजे?"
“म्हणजे प्रत्येकालाच ‘शक्तीरूपी’
देव समजणार नाही , कारण ती शक्ती म्हणलं कि त्याच्यात अगणित गोष्टी येतात आणि
पुन्हा त्याला काही ठराविक आकार नाही, रंग-रूप नाही, आपण तिला ऐकू शकत नाही, बघू
शकत नाही. तिला स्पर्श करू शकणार नाही कि तिचं चित्र काढू शकत नाही. या सगळ्या
मर्यादांवर तोडगा म्हणून माणसानी राम-कृष्ण- जिझस तयार केले अस समजू.” (मुलाला हा
मुद्दाही स्वीकारार्ह वाटला हे त्यानी शांत
राहून दाखवून दिल.)
पण गंमत अशी आहे कि जरी
आपण त्यांना काल्पनिक मानलं तरी त्याना मध्यभागी धरून ज्या-ज्या कथा आपण ऐकतो
त्याबद्दलचे पुरावे मिळाले संशोधकाना. उदाहरणार्थ भारत आणि श्रीलंकेच्या मध्ये
‘रामसेतू’, कृष्णाची पाण्याखाली गेलेली द्वारका... तिचे काही नमुने मिळाले ना
गुजरात भागात.
“आई, पण मग हे कसं झाल?”
“याचा अर्थ असा कि,
मानवाच्या कल्पनाशक्तीला जिवंत करण्याची ताकद आहे या देवामध्ये. केवळ तोच आपल्याला
अनुभव देऊ शकतो, आणि ते सुद्धा इतक्या व्यापक पातळीवर. कारण ज्यांनी हि कल्पना
केली त्यांची पूर्ण श्रद्धा होती त्या शक्तीवर आणि म्हणून ते विचार करू शकले ती
शक्ती मानवात आणण्याचा.”
“थोडं जड जातंय.” मुलानी
कबूली दिली.
“अरे, अगदी साधं उदाहरण
द्यायच झाल तर बघ, जेव्हा तुझी छोटी बहिण तुला घाबरवते आणि तू तिच्यासाठी
घाबरल्याच अगदी बेमालूम नाटक करतोस ना; किंवा ती भातुकली मांडते आणि तुला जेवायला
वाढते, तेव्हा पोट खूप भरल्याचं दाखवून कसं खुष करतोस ना तू तिला..... सेम तसंच
आहे. देवही माणसांसाठी वेगवेगळ्या रुपात येतो आणि आपल्या इच्छा पूर्ण करतो.”
“पण मग या बोटीवरच्या
लोकांना म्हणजे त्यातल्या सगळ्याना का नाही वाचवलं देवानी? त्यांची काय जगायची
इच्छा नव्हती?”
“निश्चित होती. पण हा देव आहे ना तो खूप तटस्थपणे राहू शकतो.
तुझ्या भाषेत सांगायचं तर प्रॅक्टिकल आणि इम्पार्शल. तो विनाकारण कोणाची बाजू घेत
नाही आणि कोणाला मुद्दाम डावलतही नाही. टायटॅनिक वरचे अनेक लोक वाचले सुद्धा, मग
त्यांची देवावर श्रद्धा असो किंवा नसो. देव फक्त आणि फक्त तुमच्या कर्माची फळे
तुम्हाला देतो. देवाची प्रार्थना करण्यामागचा हेतू काय आहे याबरोबर ती किती मनापासून आहे हे महत्वाच. ज्याला
देवाचं मदत करणे किंवा न करणे यामागे काय लॉजिक आहे हे कळते ना तो कधी तक्रार नाही
करणार त्याची कोणापाशी. तू परीक्षेत एखाद उत्तर जर उगाचच लांबड लाऊन लिहिलंस आणि
त्यावर शिक्षकानी नाही जास्त मार्क दिले तर तू विनाकारण त्याची तक्रार नाही करणार,
कारण तुला स्वत:ला माहिती आहे तुझा अभ्यास. नाही का?” यावर मुलाचं मिश्कील हसणं
खूप काही सांगून गेलं.
“पण आई, नुसती प्रार्थना
करून जे पाहिजे ते होत नाही. प्रयत्न करायलाच हवेत.” इति युवराज.
“हो. हे मात्र मला एकशे एक
टक्के मान्य आहे तुझं. प्रयत्न पूर्ण करायचेच, फक्त त्याचा जो रिझल्ट मिळतो ना
त्यात आपल्या प्रयत्नांपेक्षा इतर अनेक गोष्टी देवामुळे मिळतात हे मान्य करता
यायला हव. ते जमणं अवघड असतं.”
मुलगा टिव्ही पहात होता,
पण चेहरा अंतर्मुख दिसत होता....... तिथे एक रत्नहार
पाण्यात गिरक्या घेत खोल जात होता, आणि इथे त्याहीपेक्षा खोल अशा
मनाचा डोह प्रकाशत होता. तिथे टायटॅनिक
बुडाली होती, पण इथे श्रद्धेचं एक तारू अलगद काठावर येऊ पहात होतं.
No comments:
Post a Comment