नवअभ्यासकांचे स्वागत !
मागील लेखात सांगितल्याप्रमाणे आपण हे शास्त्र जाणून घ्यायचा प्रयत्न सुरु करु या.
ज्योतिष अभ्यासकांसाठी ‘पंचांग’ अतिशय महत्वाची पुस्तिका आहे. पंचांगाची ५ अंगे पुढील प्रमाणे १) तिथी २) वार ३) नक्षत्र ४) करण ५) योग
याव्यतिरिक्तदेखील पंचांगात दर पानावर लग्नसमाप्ती कोष्टक, ग्रहांची क्रांती- योग, तसेच त्यांचे राशीतील अंश-कला- विकला थोडक्यात प्रत्येक ग्रहाची गती, नक्षत्र चरण समाप्ति, दिनविशेष आणि विवाह-मुंज आदी मुहूर्ताच्या तारखा हे असते. (हे सगळे आपण हळूहळू पुढे थोडे गणित शिकलो की मग पाहू.) तर आता प्रथम या पाच अंगांचा विचार करू या. त्यापुर्वी पंचांगाच्या मुखपृष्ठावर पहा. “स्वस्ति श्रीमनृपशालिवाहन शके १९४२ शार्वरिनाम संवत्सर” म्हणजे आपण शालिवाहन राजाने सुरु केलेले शक (कालमापन पद्धत) वापरतो. यात एकूण ६० संवत्सर आहेत. ६०वे संवत्सर संपले की पुन्हा पहिले सुरू होते. त्यातले आत्ता ३४वे शार्वरी संवत्सर चालू आहे. २०२१ च्या चैत्र प्रतिपदेला ( पाडव्याला) प्लव हे संवत्सर चालू होईल आणि त्याप्रमाणे दरवर्षी पुढचे. शेवटचे अक्षय संवत्सर झाले की पुन्हा पहिले प्रभवपासून पुढे सुरू होईल. प्रत्येक संवत्सराचे फल ( परिणाम) पंचांगात वर्णन केलेले असतात. ( खाली संवत्सरांच्या क्रमवार यादीचा फोटो दिला आहे. )
१) तिथी - मराठी वर्षाचे १२ महिने आपल्याला माहितच आहेत. हे म्हणजेच चांद्रमास. यात २ पक्ष/ पंधरवडे असतात. शुक्ल प्रतिपदा ते पौर्णिमा हे १५ दिवस म्हणजे शुक्ल पक्ष आणि त्यापुढचे अमावस्येपर्यंतचे १५ दिवस कृष्ण / वद्य पक्ष. चंद्र - सुर्य अगदी शेजारी असतात तेव्हा अमावस्या असते. या स्थितीपासूनद चंद्र १२ अंश पुढे गेला कि एक तिथी पूर्ण होते. चंद्राची दैनिक गती साधारणत: ११-१४ अंश असते. तिथींचे ५ प्रकार सांगितले आहेत.
नंदा तिथी - १,६,११ आनंद देणाऱ्या तिथी
भद्रा तिथी - २,७,१२ कल्याणकारक तिथी
जया तिथी - ३,८,१३ जय देणाऱ्या तिथी
रिक्ता तिथी - ४,९,१४ रिक्त/ कमी करणाऱ्या तिथी ( या तिथी अशुभ असतात. आवर्जून चतुर्थीला शुभदिवस म्हणून वाहनखरेदी वगैरे केली जाते , त्यापेक्षा कर्ज फेडणे वगैरे करावे.)
पूर्णा तिथी - ५,१०,१५ या शुभ असतात.
२) वार - उदयात् उदयं वार: |
याचा अर्थ सुर्योदयापासून दुसऱ्या दिवशीचा सुर्योदय म्हणजे एक वार. जगात सगळीकडे वारांची नावे सारखी आहेत जी भारतीय गणितज्ञ आर्यभट्ट यांनी दिली आहेत. दिवसाच्या प्रत्येक तासावर पुन्हा विशिष्ठ ग्रहाचा अंमल असतो ज्याला होरा असं म्हणतात. सुर्योदयावेळी ज्या ग्रहाचा होरा असतो त्याचे नाव त्या दिवशीच्या वारास दिले जाते. हे होरे कसे ठरवले जाताात हे आपण ग्रहांची गती कशी असते हे पुढे पाहू त्यावेळी सांगेन.
No comments:
Post a Comment