Saturday, December 28, 2024

जानेवारी 2025

जानेवारी 2025 


शुभदिवस - 1,2,5,7,8,12,14,17,19,21, 22,26,31 


पौर्णिमा - 13 जाने , अमावस्या - 29 जाने 


मेष - एखाद्या लढवय्या सेनापती प्रमाणे बेधडक आक्रमण करण्याच्या आपल्या वृत्तीला मागील काही काळ खीळ बसल्यासारखे झाले होते. योजना तयार असल्या तरी त्या अंमलात आणण्यास काही ना काही अडचणी येत होत्या. आता त्या सोडवून आपले विचार कृतीत आणण्याचे प्रयत्न सुरु कराल. मात्र आपण आता लवकरच शनी महाराजांच्या साडेसातीला सामोरे जाणार आहात त्यामुळे आपले हेतूंविषयी पारदर्शक राहण्याचा प्रयत्न ठेवा. कोणतेही छुपे व्यवहार करण्याचा मोह टाळा. महिना अखेरीस भावंडांशी काही कागदोपत्री व्यवहार करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. संततीसौख्य उत्तम राहील. उष्णतेचे विकार असणाऱ्यांनी पूर्वार्धात आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच उच्च रक्तदाब, हृदयविकार ग्रस्तांनी पथ्य सांभाळावे. क्रोधाला आवर घालावा. सध्याच्या कालावधीत काही अनामिक भीतीदेखील सतावत असेल. सकारात्मक बोलण्याने या साऱ्याचा प्रभाव कमी करा. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्ती संयमाने वागतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती सुधारेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्ती उपासनेस प्राधान्य देतील. 


वृषभ - आनंद, सुख भरभरून अनुभवायास आवडणारी आपली राशी मेहनत करण्यातही मागे नसते. कामाचा योग्य मोबदला आणि ते आपल्या पद्धतीने करण्याचं स्वातंत्र्य या महिन्यात आपल्याला मिळाल्याने तुम्ही नक्कीच खुश रहाल. मात्र पूर्वार्धात पितृसम व्यक्तींशी काही वादाचे प्रसंग उद्बवतील. तसेच भावंडांशी वितुष्ट येण्याचा संभव आहे. यांचा मनस्ताप करून घेऊ नका, तर त्यावर वेळीच तोडगा शोधायची मानसिकता ठेवा. व्यावसायिकांनी आपल्या अधिकारांचा सतर्कतेने वापर करावा. नोकरदारांना उत्तम संधी मिळण्याची शक्यता आहे. कलाकारांच्या दृष्टिने व्यस्ततेचा कालावधी असेल. मित्रपरिवारा- सोबत आनंदात वेळ घालवाल. उत्तरार्धात काही वास्तूविषयक कामांना गति मिळेल. सद्य ग्रहस्थिती उपासनेच्या दृष्टीनेही पूरक आहे. भाग्य स्थानातील अमावस्या काहीशी अलिप्तता घेऊन येईल. आगामी काळात शनि महाराजांची दृष्टी आपल्यावर असणार आहे. त्याचीच नांदी आहे. त्यामुळे कोणत्याही प्रसंगांना नैराश्याने नाही तर धीराने तोंड द्या. संयमाने वागल्यास उत्तम परिणाम आपणांस लाभतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्ती कामात व्यस्त राहतील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तीनी मानसिकता सांभाळावी. गैरसमज टाळावेत. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी प्रवास व कुटुंबाला देण्याचा वेळ याचे नियोजन करावे. 


मिथुन - परिस्थितीचे पटकन आकलन होऊन त्यात हजरजबाबीपणे तोडगा काढण्याचे सामर्थ्य आपल्या राशीत आहे. या महिन्यात अनेक स्थित्यंतरे आल्याने तुमच्या या स्वभावपैलूचा तुम्ही चांगला उपयोग करून घ्याल. आपल्या राशीतच होणारी शाकंभरी पौर्णिमा व्यावसायिक, आर्थिक व कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढवणारी असेल. आपले नियोजन कौशल्य पणाला लावून त्या आपण नीट पार पाडाल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. मातुल घराण्यातून काही बाबतीत मदत मिळू शकेल. आपल्या संवादकौशल्याचा योग्य उपयोग करून घ्या. संततीबाबत काही भाग्यकारक घटना अनुभवास येतील. व्यावसायिक भागीदाराशी किंवा जोडीदाराशी काही बाबतीत मतभेद अथवा दुरावा येण्याची शक्यता. कामानिमित्त प्रवास संभवतात. महिन्याच्या शेवटच्या कालावधीत काही कारणाने आर्थिक फटका बसण्याची शक्यता. तसेच वाहन चालवताना आवर्जून काळजी घ्यावी. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना संमिश्र कालावधी. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना अनेक आघाड्या सांभाळाव्या लागतील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींनी कोणालाही गृहित धरू नये. 


कर्क - दुसऱ्यांचा  जास्तीत जास्त विचार करून त्यांना अधिक सुखद वातावरण देण्याचा आपला प्रेमळ स्वभाव आहे. पण त्यात तुम्ही हळवेपणाने गुंतून राहता; आणि मग मनस्ताप सहन करावा लागतो. पण सध्याच्या ग्रहस्थितीत यापलीकडे जाण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. प्रत्येकाला तुमच्याकडून योग्य ते द्यायचा प्रयत्न करतानाच याबाबत अलिप्तता ठेऊन समाधान मिळवाल. मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनांना धीराने सामोरे जायची मानसिकता ठेवाल. यामधे आपल्या उपासनेची अतिशय महत्वाची भूमिका असेल. पौर्णिमेदरम्यान उत्तम अनुभूती येईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कामाच्या बाबतीत मात्र हलगर्जी राहू नका. नोकरदारांना नवीन संधी चालून येतील. अचानक मोठी जबाबदारी घ्यावी लागली तरी विचारपूर्वक नियोजन करून या संधीचा योग्य उपयोग करून घ्या. अपेक्षित नसली तरी हाताखालच्या लोकांकडून उत्तम साथ मिळेल. महिना अखेरीस संततीशी वादाचे प्रसंग उद्भवतील. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना अनेक लाभदायक संधी. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींनी अपेक्षाविरहित कामाचा आनंद घ्यावा. आश्लेशा नक्षत्राच्या व्यक्तींनी कामाच्या योग्य नियोजनाला प्राधान्य द्यावे. 


सिंह- प्रत्येकातील गुणवत्ता हेरून त्यांना योग्य संधी द्यायची हे आपल्याला उत्तम जमते. तसेच स्वतःचा आब राखून सर्वांमधे मिसळणारी अशी आपली राजराशी आहे. सध्या आपल्यासाठी संमिश्र महिना आहे. सातत्याने एखाद्या महत्वाच्या जबाबदारीत अडकल्याने आनंददायी घटना घडत असल्या तरी तुम्हाला सवड मिळणार नाही. घरामधे काही स्थित्यंतरे होण्याची शक्यता आहे. काही नवीन योजना राबवण्याचा अटोकाट प्रयत्न कराल. व्यावसायिकांना नवीन कल्पना अंमलात आणण्याच्या संधी मिळतील. तुमच्या नियोजन कौशल्याचा वापर करून त्याचा योग्य फायदा करून घ्याल. नोकरदारांना हितशत्रूंवर तात्पुरता वचक ठेवण्यात यश येईल. संततिसौख्य उत्तम राहील. पौर्णिमेदरम्यान काही अनपेक्षित लाभ होतील. मित्रपरिवारासोबत आनंदात वेळ घालवाल. उत्तरार्धात तब्येतीची आवर्जुन काळजी घ्यावी. अमावस्येदरम्यान औषधपाण्यावर तसेच वाहन दुरुस्तीवर खर्च होण्याची शक्यता. मातृसम व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना शारीरीक व मानसिक व्यस्ततेचा महिना. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्ती खूश राहतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना संततिसौख्य उत्तम राहील. 


कन्या - अतिचिकित्सक आणि कोणत्याही गोष्टीतील उणीव चटकन लक्षात येणे हे आपल्या राशीचे गुणधर्म आहेत. याचा उपयोग केवळ दोष दाखवून देण्यात न करता ती उणीव भरून काढण्यासाठी मदत करण्याचे प्रयत्नहि या महिना अखेरीस आपण कराल. त्यासाठी स्वतः जातीने लक्ष घालून काम कराल. मात्र यामधे निष्कारण त्रागा करून घेऊ नका. संततीशी वादाचे प्रसंग उद्भवतील. आर्थिक स्थिती ठिक राहील. करमणुकीवर खर्च होण्याची शक्यता आहे. मित्रवर्गाबद्दल मनात काही तेढ निर्माण होऊ शकते. इतरांच्या तुमच्याकडून वाढीव अपेक्षा आहेत हे लक्षात आले तरी तटस्थ भूमिका स्विकाराल. आरोग्य चांगले राहील. आपल्या योग्यतेनुसार पोषक असे वातावरण आपल्याला लाभत नाही; असे विचार त्रासदायक ठरू शकतात. उपासनेला प्राधान्य देऊन त्यातून मार्ग शोधाल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्ती संयमित वागतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींनी मानसिकता सांभाळावी. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवावे. 


तूळ - समतोल साधणे, एखाद्या प्रसंगात कोणा एकाला झुकते माप न देता समबुद्धीने सर्वांगीण विचार करणे हे आपले गुण आहेत. या गुणांना अधोरेखित करत स्वतःबाबत विचार करायला हवा आहे. काहीशी गोंधळलेली मनःस्थिती , स्वतःवर ताबा न राहणं आणि निर्णय न घेता येणं अशा कोंडीत सध्या सापडला आहात. आपला वेळ आणि पैसा कुठे खर्च होतोय याकडे तटस्थपणे पहा. इतरांकडून कोणतीही अपेक्षापूर्ती होणार नाही हे लक्षात घेऊन अवलंबून राहणे टाळा. व्यावसायिकांना कामे मार्गी लावण्यात अडचणींचा सामना करावा लागेल. नोकरदारांना मोबदला मिळण्यास त्रास होण्याची शक्यता आहे. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी शब्द व पैसे जपून वापरावेत. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींनी अपेक्षा ठेवणे टाळा. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी प्रवासात काळजी घ्यावी. 


वृश्चिक - कोणत्याही दिर्घकालीन कामासाठी लागणारे सातत्य, चिवटपणा आपल्याकडे पुरेपूर आहे. सध्या काही ना काही कारणाने मनःस्थिती जरी नाजूक असली तरी महत्वाची कामे संयमाने हाताळाल. पुढील अडीअडचणींचा अंदाज आपण घेऊ शकता आणि त्यानुसार आवश्यक अशी तजवीज करण्याचीही दूरदृष्टि आपल्याकडे आहे. पूर्वार्धात विवाह विषयक बोलणी करण्यास पूरक कालावधी आहे. उत्तरार्धात कामानिमित्त प्रवास घडतील. केलेल्या कामांचा परतावा मिळेल. जोडीदाराला नवीन संधी मिळू शकतील. व्यग्रता वाढल्याने एकमेकांना पुरेसा वेळ देता येणार नाही. संततीविषयी सुवार्ता कळतील. पौर्णिमेदरम्यान एखादी संधी चुकल्याची खंत वाटत राहील. अमावस्येदरम्यान प्रवासाची शक्यता. उच्च रक्तदाब , अनिमिया अशा विकारांच्या लोकांनी आवर्जून काळजी घ्यावी. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी उपासनेला महत्व द्यावे. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्ती कामात व नियोजनात व्यग्र राहतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना कामानिमित्त प्रवास घडतील. 


धनु - आत्मविश्वासू, सात्विक आणि सातत्याने प्रगतिशील अशी आपली रास आहे. मात्र नेमके कोणत्या दिशेने पाऊल उचलावे असा काही ना काही निर्णय घेता येणे आपल्यासाठी अवघड होते. अशीच गोंधळलेली मनोवस्था या महिन्यात होऊ शकते. महिन्याच्या पूर्वार्धात वास्तूविषयक कामे मार्गी लावाल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आधार वाटेल तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी वाटेल. कामाच्या ठिकाणी काही जबाबदारी हातात आल्याने खूष रहाल. आर्थिक स्थिती ठिक राहील. संततीची आरोग्यविषयक काळजी घ्यावी. जोडीदाराबरोबर सध्या तणावाचे संबंध राहण्याची शक्यता आहे. काही किरकोळ प्रसंगांमुळे मनाची चलबिचल अवस्था राहील. मोकळेपणाने संवाद होणार नाही. आपली नित्य उपासना सगळ्या प्रसंगात योग्य मार्ग सूचवेल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींनी आर्थिक नियोजनावर भर द्यावा. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्ती दैनंदिनीत व्यस्त राहतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी लाभ होतील. 


मकर- फळाची अपेक्षा न करता कार्यरत राहणे हा आपला स्थायीभावच आहे. साडेसातीचा कठिण कालावधीस आपण धीराने सामोरे गेलात. यात तुम्हाला साथ देणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करून पुढील योजना आखण्यास तयार व्हा. आधी केलेल्या कामाचा परतावा हप्त्याहप्त्यांत मिळण्याची शक्यता आहे. मित्रपरिवाराचा अनुभव विशेष चांगला नसला तरी आता तुम्हाला फरक पडणार नाही. स्वतःविषयी एक नवीन आत्मविश्वास तयार झाल्याने तुमची पावले उचलाल. जोडीदाराशी काही कारणाने मतभेद होऊ शकतात. घरामधे तणाव वाढेल, तरी संयमाने परिस्थिती हाताळाल. अमावस्येदरम्यान काही जोडीदारविषयी तसेच आर्थिक चिंता जाणवेल. राशीतच होणाऱ्या अमावस्येला मानसिक तोल सांभाळावा. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींची मानसिकता चांगली राहील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींनी चिडचिड टाळावी. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी आर्थिक नियोजनास महत्व द्यावे. 


कुंभ - प्रत्येक बाबतीत योग्य तर्क लावून निर्णयाप्रत येणे ही आपली खासियत आहे. साडेसाती आपणांस अनेक बाबतीत भलेबुरे अनुभव देत आहे आणि ते विनातक्रार अनुभवून त्यातून योग्य ते घेण्याकडेच आपला कल राहीला असेल. यापुढेही सामंजस्याने वागून काही कुटुंबविषयक निर्णय घ्यावे लागतील. वास्तूविषयक कामे होतील. आर्थिक स्थिती ठिक राहील मात्र काही अनपेक्षित खर्चांना सामोरे जावे लागेल. भावंडांबरोबर काही वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. पौर्णिमेदरम्यान सुवार्ता कळतील. उत्तरार्धात जोडीदारावर खर्च होईल. व्यावसायिक भागीदारीवर काही नुकसानदायक परिणाम होण्याची चिन्हे आहेत. रागाच्या भरात निर्णय घेऊ नका. अमावस्या आरोग्यविषयक तक्रारींची. काम व कुटुंब यात ओढाताण होऊ शकते. महिनाअखेरीस व्यस्तता वाढेल, यासाठी सुरूवातीपासूनच काटेकोर नियोजन पाळावे. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी संधीचा लाभ घ्यायचा प्रयत्न करा. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींनी  जमाखर्चाचा ताळमेळ ठेवावा. पुर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती वास्तूविषयक कामे करतील. 


मीन - दुसऱ्यांवर लगेच विश्वास ठेवणारी, देवभोळी अशी तुमची रास आहे. सध्या साडेसातीच्या महत्वाचा टप्पा सुरु होण्याच्या मार्गावर आहे. अशात ग्रहस्थिती तुम्हाला तुमच्या व्यक्तीमत्वाचे वेगळेच पैलू दाखवत आहे. लोकांच्या विषयी चांगला विचार केलात पण बोलणे मात्र टोचून, वर्मावर बोट ठेवणारे असेल तर गैरसमजच वाढत जातील. कोणतेही स्पष्टिकरण देऊन उपयोग होणार नाही, त्यामुळे सध्या बोलणे नियंत्रणात ठेवा. सर्वकाही केवळ आपणच करू शकतो अशी अहंमन्यता टाळा. नोकरदारांना जबाबदारीची कामे स्विकारावी लागतील.विवाह  इच्छुकांना उत्तम कालावधीअसला तरी योग्य मध्यस्थांकरवी बोलणी करावीत. व्यावसायिक वर्गाला नवीन संधी मिळण्याची शक्यता. महिना अखेरीस मातृसम व्यक्तींच्या आरोग्याची काळजी वाटेल. पुर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी आनंदी रहाण्याचा प्रयत्न करावा. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी खर्चाचे स्तोम माजवू नये. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींनी कामाच्या नियोजनावर भर द्यावा. 

No comments: