Monday, August 13, 2018

बागेतला बाबा 




आज खूप दिवसांनी तो बागेत आला. लेकिनी हट्टच धरला. बाकी कोणाला दाद दिली नाही तरी तिचं मन मात्र मोडवत नाही. बागेत गेल्यावर त्याला दिसलं खूप बाबा आहेत. उगाचच आपल्याला वाटत होतं कि आपल्याला अगदी बायकांच्या गराड्यात असल्यासारखं वाटेल. बागेत गेल्या गेल्या मुलगी सुसाट धावतच सुटली झोपाळ्याकडे. क्षणात त्याला धोक्याची जाणीव झाली. पलीकडच्या झोक्याकडे जाताना आधीचा झोका direct कपाळावर आपटणार हिच्या. तो हि जोरात धावला. मुलीला मागं खेचलं. मुलगी चांगलीच भेदरली होती. त्यानी काहीच झालं नाही असं दाखवलं. तिच्याकडे पाहून डोळे मिचकावत हसला. तिला कळलं बाबा आईला काहीच सांगणार नाही. हायसं वाटून ती जरावेळ निवांत झोका खेळली. मग जंगलजिम , बाबाच्या कडेवर बसून ' लोंबकळत' जाणे, सी सॉ खेळायला पलीकडे strong बाबाच व्यवस्थित जोर देउ शकतो. " मला खूप मज्जा येतीये " एवढं लेकीचं एक वाक्य पुरेसं होतं थकवा घालवायला. आता घसरगुंडी.... तिथे खेळताना एक मुलगा हिच्या मागोमाग होता. त्याचे पाय लागू नयेत म्हणून याची धडपड. तेवढ्यात तो मुलगा हक्कानी याच्या लेकिला म्हणाला .... ' ए चल आपण तिकडे जाऊ' आणि लेकहि ' बर' म्हणत निघाली कि. याला जरा रागच आला त्या मुलाचा. आवाजात नाराजी न लपवता तो मुलीला विचारता झाला ... ' कुठे चालली आहेस? ' लेकीची पावलं थोडी अडखळली पण ती पटकन म्हणाली ' ये तु पण' आणि पळाली. कपाळावरची आठी जरा दाट झाली आणि तेवढ्यात कानावर आलं .... " तिकडे तळ्यातले मासे बघायला गेलेत. रोजचा कार्यक्रम आहे. " नक्कीच त्या मुलाची आई असावी. ' हो का ' तो कसनुसं हसून म्हणाला. पण लेक त्या मुलाच्या मागेमागे तो दाखवेल ते बघत जात होती हे त्याला जाम खटकत होतं. मुलगा उगाच तोऱ्यात अख्ख्या तळ्याभोवती फिरत होता. शेवटी घोड्यावरून रपेट मारण्याच्या निमित्ताने त्यानी काढलंच लेकीला तिथून. आता रपेट मारताना तोही सगळा वेळ तिच्या मागोमाग चालत राहिला. मुद्दाम काही बोलून तिला ' राणी सरकार' वगैरे म्हणलं कि ती कशी गंमतशीर बघते ते त्याला फार आवडायचं. घोडा झाल्यावर दमलेल्या राणी सरकारांना नारळपाणी दिलं. ते एवढं मोठं शहाळं हातात धरून ओणवा उभा रहायला सेवक तत्पर होताच. सगळं मनासारखं खेळून झाल्यावर मगच स्वारी घरी पोचली. आज रात्री गोष्ट सांगायचा हुकूम आपल्यावर लागु होणार हे त्याच्या लक्षात आलंच एव्हाना......
घरी गेल्यावर मात्र एवढा वेळ बोलण्या- वागण्यात मृदु असलेला बाबा जरा ताठ झाला. ' हातपाय स्वच्छ धुवून घे' ... रामरक्षा म्हणा नीट' ....... ' पानात वाढलेलं सगळं संपवायचं ' वगैरे गोष्टीत लाड नाहीत. रात्री गोष्ट सांगून तिला झोपवताना त्यालाही कधी झोप लागली ते कळलंच नाही.
रात्रीच्या प्रार्थनेत ' तिने' मागितलं ..... हा असा दमलेला बाबा घरोघरी असु दे.

- प्रज्ञा तिखे