Thursday, January 17, 2019

भाग्यांक आठ

आठ या क्रमांकावर शनि या ग्रहाचे अधिपत्य आहे. शनि म्हणलं की साडेसाती, त्रास एवढंच समीकरण आपण लावतो. ज्योतिष शास्त्रातसुद्धा शनि हा पापग्रह समजला जातो. शनि विलंब करणारा, तसेच कोणत्याही गोष्टीचे थोडे हातचे राखून फलित देणारा. यामुळे आठ भाग्यांक असणारे (ज्यांची जन्मतारीख ८, १७,२६ आहे.) थोडे निराशेकडे, आपल्याला अपेक्षित यश मिळणार नाही असा नकारात्मक विचार करणारे असे असू शकतात; पण यांच्याकडे असणारी चिकाटी, संयम या गोष्टी वाखाणण्याजोग्या असतात. शनि हा ग्रह भोगायला लावतो यापेक्षा तो भोग संपवतो असा विचार करण्याची सकारात्मकता आठ भाग्यांकचे लोकं अगदी लीलया बाळगतात. या विचारसरणीचा त्यांना व्यावहारिक फायदा नक्कीच होतो, पण काही वेळा इतर लोकांना मात्र हे सदोदीत शिक्षकाच्या भूमिकेत वावरतात असं वाटू शकतं. शनिचा अंमल असल्याने हे लोक धीरगंभीर चेहऱ्याचे, सतत गहन विचारात गढले असल्याचे वाटतात. शनिचा आकुंचन हा गुणधर्म देखील आहे. म्हणजे भीतीने चेहरा पांढरा फटक होतो असं जेव्हा आपण म्हणतो त्यामागे शनीचे कारकत्व असते. त्यामुळे हा भाग्यांक असलेल्या लोकांच्या पत्रिकेत शनीचे इतर ग्रहांशी काय योग होतात यावर यांना होणारे आजार अवलंबून असू शकतात. पण मुळातच रक्तातील लाल पेशी कमी होणे, कमी रक्तदाब यासारख्या आजारांपासून लांब रहाण्याची खबरदारी यांनी घ्यावी.
आता तारखेनुरूप विचार करू. १७ या तारखेमधे रवि आणि नेपच्यून या ग्रहांची जोडी आहे. रवी अधिकार तर नेपच्यून गुढत्व दर्शवतो. आपले अधिकार जरा खुबीने वापरण्यात यांचा हातखंडा असतो. पत्ते खेळताना हुकमी एक्का कुठे वापरावा याबद्दल यांचा आडाखा चुकणार नाही. याचा यांना स्वतःला फायदा किती होईल; हे पत्रिकेत शनी- रवी यांचा काय योग आहे त्यावर अवलंबून राहील. हे लोक दुसऱ्या लोकांसाठी मात्र निश्चित योग्य सल्लागार होऊ शकतील असं मात्र वाटतं; कारण शनिकडे संयम आहे. इतरांच्या बाबतीतही हे घाईने काही जुजबी उत्तर देऊन किंवा वेळ मारून नेण्यासाठी काहीतरी सांगून वाटेला लावतील असं होणार नाही. शनि हा ग्रह सेवा दर्शवतो. थोडक्यात यांची इच्छा असो अथवा नसो, हे इतरांच्या उपयोगी पडतातच आणि त्याचे योग्य ते returns मिळाले नाहीत तर शनि जे दु:ख दर्शवतो, ते यांना अनुभवावे लागते.
आता २६ तारखेचा विचार करू. येथे जोडी येते चंद्र आणि शुक्र यांची. चंद्र चंचलता तर शुक्र आनंद दर्शवतो आणि या दोघांवर संयम आणि दु:ख यांचे प्रतिनिधित्व करणारा शनिचा अंमल. कसे असेल २६ तारखेचे व्यक्तिमत्त्व ? गोंधळलेले? कुठे कसं वागावं याबाबत संभ्रमात असलेले ? मुळीच नाही. यांच्या चंचलतेला संयमाची किनार असते तर आनंदात एक प्रकारची धीरगंभीरता असते. प्रसंग कसाही असो हे आंतरीक शांती ढळु देणार नाहीत.
एकूणच भाग्यांक आठ असलेले थोडे गंभीर, नैराश्यवादी, स्थितप्रज्ञ, संयमी वृत्तीचे असतात असं म्हणू शकतो. त्यांच्यात या प्रत्येक गोष्टीची तीव्रता किती असेल ते मूळ पत्रिकेतील ग्राहयोगांवर अवलंबून असेल, पण तुर्तास आपल्या स्वभावातील नेमकी मेख ओळखून काय कमी- जास्त करावे याचा विचार करायला यांनी नक्कीच सुरुवात केली असेल. या बाबतीत तुमचा भाग्यांक तक्ता तुम्हाला नक्कीच फायद्याचा होऊ शकतो.
तुम्हाला काही प्रश्न असतील तर जरूर comment करा, आणि नक्की follow करा http://pradnyaastro.blogspot.com.

No comments: