Sunday, July 21, 2019

२७ योग
२७ योग हे रवि व चंद्र यांच्या कुंडलीतील अंतरावर अवलंबून असतात. जेव्हा रवि व चंद्र यांच्या एकूण भोगांची बेरीज ८०० कला असते तेव्हा एक योग पूर्ण होतो. ८०० कला म्हणजेच १३°|२०' म्हणजेच दर १३ अंश २० कलानी एक योग तयार होतो. थोडक्यात रवि (आत्मा) व चंद्र (मन) आत्मा + मन यांच्या संयोगाने जीव जन्मतो असे आपण म्हणतो म्हणूनच पत्रिकेत जन्म कोणत्या योगावर झाला आहे हे महत्वाचे आहे. २७ योगांची नावे पुढीलप्रमाणे :-
१) विष्कंभ २) प्रीती ३) आयुष्मान ४) सौभाग्य ५) शोभन ६) अतिगंड ७) सुकर्मा ८) धृति ९) शूल १०) गंड  ११) वृद्धि १२) धृव १३) व्याघात १४) हर्षद १५) वज्र १६) सिद्धि १७) व्यतिपात १८) वरियान १९) परिघ २०) शिव २१) सिद्ध २२) साधय २३) शुभ २४) शुक्ल २५) ब्रह्मा २६) ऐंद्र २७) वैधृति.
जन्म कुंडलीत ज्या योगावर जन्म झाला आहे त्यावरून जातकाचे स्वभाव गुणधर्म , त्याची एकंदर वागणूक आपल्याला कळु शकते. २७ योगांपैकी ९ योग ज्योतिषीय दृष्ट्या अशुभ आहेत. ते पुढीलप्रमाणे :-
१)विष्कंभ २) अतिगंड ३) शुल ४) गंड ५) व्याघात ६) वज्र ७) व्यतिपात ८) परिघ ९) वैधृति
गणिताने योग सिध्द करण्याकरता पुढील रीत वापरावी.
(स्पष्ट चंद्र + स्पष्ट रवि ) एकूण भोग कला ÷ ८०० कला.
आता योगांची माहिती पाहू.
१) विष्कंभ :-  ००°_ १३°|२०'
हा अशुभ योग आहे. याचा अर्थ विषाचा कुंभ. जरी हा योग अशुभ असला तरी या योगावरील जातक शत्रूवर विजय मिळवणारा, बुद्धिमान,  धनवान , स्थावर मालमत्ता मिळवणारा असतो. त्याचे व्यक्तिमत्त्व लोभस असते व परिवारातील लाडका सदस्य असतो. कौशल्यपूर्ण कामे करण्यात निपुण असतो. या जातकाला कधी आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत नाही व यांना कौटुंबिक सौख्यहि उत्तम लाभते. समाजात यांचा प्रभाव असतो. पण या योगावर कोणतीही शुभ कार्ये करु नयेत.
२) प्रीती :- १३°|२०' - २६°|४०'
हा शुभ योग आहे. नावावरूनच कळते कि या योगावर जन्मणाऱ्या व्यक्ती दिलदार स्वभावाच्या, मनमिळाऊ व आनंदी असतात. यांना प्रवासाची आवड असते. वक्तृत्व उत्तम असते. विरूध्दलिंगी व्य्क्तींबरोबर नम्र व्यवहार असतो. जोडीदाराबरोबर खूप चांगले नाते असते.  बुद्धिने चलाख असतात व यश कसे मिळवायचे याची पुरेपुर जाण असते. एखाद्या कार्यासाठी झोकून देण्याची तयारी असते. आनंदी आयुष्य जगतात.
३) आयुष्मान :- २६°|४०' - ४०°|००'
या  योगावर जन्मणाऱ्या व्यक्तिंमधील उत्तम नेतृत्वगुणामुळे ते यशस्वी होतात. ते दिर्घायु असतात. त्यांचे निर्णय सहसा चुकत नाहीत व ते सर्वमान्य असतात. उत्तम संस्कार व संस्कृती जपणारे असतात. त्यांची कष्ट करण्याची तयारी असते व कष्टाचे फळही उपभोगतात. यांना ललित कलांची आवड असते. धनवान असतात. शरीराने मजबूत व शत्रूवर मात करणारे असतात.
४) सौभाग्य :- ४०°|००' - ५३°|२०'
नावाप्रमाणेच हा शुभ आहे. या योगावरील जातकांचे बोलणे सकारात्मक व लाघवी असते. अतिशय बुद्धिमान असतात. पैसा चांगल्या मार्गाने मिळवतात. लोकांकडून यांच्या गुणांचे कौतुक होते व यांच्यात अनेक उपजत गुण असतात. सुगंधी वस्तूंची आवड असते. विरूध्द लिंगी व सुंदर व्यक्तिंचे आकर्षण असते. केटरिंगच्या व्यवसायात तसेच भागीदारीत केलेल्या व्यवसायात उत्पन्न असू शकते. घरापासून दूर वास्तव्य करु शकतात.
५) शोभन :- ५३°|२०' - ६६°|४०'
या योगावरिल जातक उत्तम बुद्धी , नीती व शुद्ध भावनेचे असतात. पण इतरांच्या चुकीच्या वागण्याचा खूप त्रास करून घेतात. जबाबदारी घेण्याची आवड असते व ती नीट पार पाडतात. यांचा जोडीदार आकर्षक व गुणवान असतो. हे थोडे आक्रमक स्वभावाचे असतात. पुत्रसंतती अधिक व संततीसौख्य उत्तम. कलात्मकतेची व अन्नपदार्थांची आवड असते. व्यवसायात यशस्वी ठरतात.
६) अतिगंड :- ६६°|४०' - ८०°|००'
हा अशुभ योग आहे. या योगाच्या जातकांना चित्रपट, संगीत, कलेची आवड असते. लोकांच्या भांडणात रस असतो . अतिशय कणखर मनाचे व धैर्यशाली असल्यामुळे सहसा कोणाच्या प्रभावाखाली रहात नाहीत. थोडे बाहेरख्याली स्वभावाचे असतात. मातेस त्रास होऊ शकतो. घराण्याला बट्टा लागेल अशी कृत्य यांच्याकडून होण्याची शक्यता.
७) सुकर्मा :- ८०°|००' - ९३°|२०'
या योगावरील जातक धनवान, नीतीमान , जबाबदार असतो. व्यावहारिक पण लोभी वृत्तीचा असु शकतो. धार्मिक गोष्टींची आवड असणारा, इतरांचा कळवळा असतो. यांच्या वागणुकिमुळे ते इतरांवर स्वतःची छाप पाडतात.
८) धृति :- ९३°|२०' - १०६°|४०'
विज्ञानाची आवड असते. अवकाश तंत्रज्ञानात रस असतो. कणखर मनाचे व स्वतःच्या मनाचा थांग न लागु देणारे असतात. सुगंधी द्रव्यांची आवड असते. वृत्ती बाहेरख्याली. योग्य विचार करून निर्णय घेतात. कौटुंबिक सौख्य लाभते व यशस्वी होतात.
९) शूल :- १०६°|४०' - १२०°|००'
हा अशुभ योग मानला जातो. या योगावर जन्मणारे जातक सत्यप्रिय व सत्कर्मी असतात. गुणवान व सुदैवी असतात. शारीरिक ठेवण लवचिक असते. उच्च विचार व चपळ असतात. ते धार्मिक गोष्टींमधे खूप ज्ञान मिळवतात पण नशीबाने पैसाहि मिळत असतो त्यामुळे इतर भौतिक इच्छाहि पूर्ण करतात. जरी असे अनेक गुण व सुखी क्षण असले तरी या योगाच्या अशुभत्वामुळे त्यांना कसलेतरी दु:ख असते. शारीरिक यातना भोगाव्या लागतात.
१०) गंड :-  १२०°|००' - १३३°|२०'
हा अशुभ योग आहे. या योगावरील जातकांचा बांधा मध्यम असतो. यांचा स्वभाव अति बडबडा, सत्यप्रिय व अभिमानी असतो. हे यांच्या तब्येतीची जास्त काळजी घेतात. यांना समाजातील वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो यामुळे सुरुवातीला मानहानी, मनस्ताप यातून त्रास होतो; पण ते स्वतःच्या इच्छाशक्तीवर व कार्यतत्परतेमुळे त्यातून स्वतःला बचावतात. शारीरिक त्रास होण्याची शक्यता.
११) वृद्धी :- १३३°|२०' - १४६°|४०'
यांच्यातील सारासार विचारबुद्धी वाखाणण्याजोगी असते. कुटुंबावर प्रेम करतात व तीच त्यांच्यासाठी खरी संपत्ती असते. यांना मिळणाऱ्या संधीवर व त्यांच्यावर झालेल्या संस्कारांमुळेच ते प्रगती करतात. या योगाचा प्रभाव हा फक्त जातकावरच नाही तर त्याच्या कुटुंबावर, संततीवर देखील दिसतो. यांची शारीरिक ठेवण बांधेसूद व आकर्षक असते. बोलणे ठाम व शुद्ध उच्चार असतात.
१२) धृव :- १४६°| ४०' - १६०°|००'
यांचा स्वभाव शांत, संयमी असतो. काही वेळेस अपवित्र व दुष्ट विचार/ कृती करण्याकडे कल दिसतो पण शत्रूवर मात करतात. बोलणे ठाम व बुद्धिवादी असते. समाजातील सर्व स्तराकडुन यांना प्रेम मिळते. आपल्या स्वभावाने सर्वांना जिंकून घेतात.
१३) व्याघात :-  १६०°|००' - १७३°|२०'
हा अशुभ योग आहे. या योगावर जन्म असणाऱ्या व्यक्तींची रहाणी अस्वच्छ असते. चौर्य कर्म करणे, क्रूरपणे वागणे- बोलणे याकडे कल असतो. स्वभाव तापट व विक्षिप्त असतो. यामुळे यांचे शत्रू अधिक असतात. यांचा गुण म्हणजे एखादे काम ते स्वतःला पूर्णपणे झोकून देउन करतात. त्यांचा अनेक कौशल्यपूर्ण कामांमधे हातखंडा असू शकतो. याच गुणाच्या जोरावर ते प्रसिद्धी मिळवतात व जीवनात यशस्वी होतात.
१४) हर्षण :- १७३°|२०' - १८६°|४०'
ज्योतिषीय दृष्ट्या हा अतिशय शुभ योग आहे. या योगावरिल जातक अतिशय सुदैवी असतो. खुप सुखी व आनंदी आयुष्य यांना लाभते. सर्व शास्त्र व कलांमधे निपुण असतात. जातक बुद्धिमान व गुणवान असतो. समाजाकडून यांच्या गुणांची कदर होते व मानमरातब मिळतो.
१५) वज्र :- १८६°|४०' - २००°|००'
हा अशुभ योग आहे. या योगावरिल जातक स्वार्थी, धनवान पण कंजूस व क्रूर असतो. बोलणे गावंढळ असते. पापाचरणाकडे कल असतो. या योगाच्या गुणधर्माला अनुसरून या जातकाच्या विशेषत: बाहूंमधे बल असते. यांचा शारीरिक जोम व ताकदीमुळे यांना शारीरिक कष्टाची कामे सहज जमतात. धैर्यवान असतात व शस्त्र हाताळण्यात वाकबगार असतात. तसेच एखाद्या गोष्टीतील त्रूटी पटकन लक्षात घेतात त्यामुळे देखरेखीची कामे उत्तम करतात. यांनी इतरांच्या सकारात्मक बाजूकडे पहाणे गरजेचे असते.
१६) सिध्दि :- २००°|००' - २१३°|२०'
या योगावरिल जातकास सर्व सुखांचा उपभोग घेता येतो. धनवान, गुणवान असतात. कोणत्याही क्षेत्रात उत्तम यश मिळवतात. वृत्ती त्यागी असते. स्वतःची कामे कौशल्यपूर्णतेने करण्याच्या प्रयत्नात असतात. सामाजिक जाणीव उत्तम असल्याने गोरगरिबांना आर्थिक मदत करणे यासारखी दानधर्माची कामे करतात. तरी या जातकांना शारीरिक त्रास भोगावा लागण्याची शक्यता असते.
१७) व्यतिपात :- २१३°|२०' - २२६°|४०'
हा अशुभ योग आहे. यांना प्रत्येक कामात सतत अडथळे येतात व अपयशाचा सामना करावा लागतो. पण अपयशाने खचून न जाता त्यातून मार्ग काढण्याची यांची वृत्ती असते. सतत अडथळे आल्यानेयांचा स्वभाव थोडा क्रूरतेकडे झुकणारा होऊ शकतो. लहानपणीच त्यांच्यावर अनेक प्रसंग येतात पण तारुण्यात त्यांना हवे तसे यश मिळवतात व आनंदी राहतात.
१८) वरियान :- २२६°|४०' - २४०°|००'
या व्यक्ती इतरांच्या आयुष्यात आनंद आणतात. हा योग जातकाला आदर, पैसा मिळवून देतो. वृत्ती बढाईखोर असते. ललितकलांमध्ये स्वारस्य असते. सृजनशक्ती असते. या क्षेत्रात लवकर यशस्वी होतात. हा योग जातकास वरच्या पदावर नेणारा आहे. धर्मावर विश्वास असतो. यांच्या धैर्य व आत्मविश्वास या गुणांमुळे शत्रूच्याही मनात आदर निर्माण होईल. व्यावसायिक भागीदारालाही यांचा अभिमान असतो. पण तो कदाचित कधी व्यक्त होत नाही. धनसंपत्तीचा उपभोग घेतात.
१९) परीघ :- २४०°|००' - २५३°|२०'
हा अशुभ योग आहे. या योगावरिल जातक थोडे कद्रू स्वभावाचे, दुतोंडी , लोभी व हीन गुणी असतात. पण योगाच्या नावाप्रमाणे यांच्या ज्ञानाचा व्यासंग मात्र मोठा असतो. अध्यापन क्षेत्रात चांगला दर्जा मिळवतात. यांना साहसी, मर्दानी खेळांची आवड असते. यांना विविध विषयातील ज्ञान असते व त्यायोगे स्वतःचे व घराण्याचे नाव मोठे करतात. मृदुभाषी व प्रेमळ असतात. कौटुंबिक सौख्य लाभते.
२०) शिव :-  २५३°|२०' - २६६°|४०'
या योगावरिल जातक सात्विक, धार्मिक, तीर्थयात्रा करण्याची आवड असणारा, पुत्रसौख्य व धनसंपदा लाभते. या लोकांना भौतिक सुखात रस नसतो. पण ते निस्वार्थीपणे लोकोपयोगी कामे करतात व त्यांना समाजात मानमान्यता मिळते. शुद्ध मनाचे असतात.
२१) सिद्ध :- २६६°|४०'- २८०°|००'
या योगावरिल जातक गुप्त सल्लागार, व्यवहारकुशल व निर्मळ मनाचे असतात. या जातकांचा तंत्र- मंत्र शास्त्रावर विश्वास असतो व त्याचा ते वापर करण्यास उत्सुक असतात. विज्ञान , तत्वज्ञान, साहित्य यात यांना रुची असते. यांचा जोडीदार आकर्षक व बुद्धिमान असतो. कोणत्याही कामामागे यांचा शुद्ध हेतू असतो व त्यांना त्यांच्या चांगल्या कामांसाठी आपोआपच प्रसिद्धी मिळते.
२२) साध्य :- २८०°|००' - २९३°|२०'
या योगावर जन्मणारे जातक त्यांच्या विषयात उत्तम ज्ञान असते व कर्तव्यबुद्धीने वागणारे असतात. पण इतर लोकांच्या मनात यांच्याविषयी आकस असतो. ते अतिशय विश्वासू, हुशार व खुल्या मनाचे असतात. नवनवीन कल्पनांचा स्वीकार करतात. यांना संगीत, ललित कलांमधे रुची असते. बुद्धि निश्च्यात्म्क असते व आत्मविश्वास असतो. संयम हा त्यांचा मुख्य गुण आहे. स्वतः प्रयत्नपूर्वक केलेल्या कामांचे योग्य फळ मिळण्याची वाट पाहण्याची तयारी असते. पूर्ण विचार करून निर्णय घेतात.
२३) शुभ :- २९३°|२०' - ३०६°|४०'
या व्यक्ती प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या व समाजाकडून आदर मिळवणाऱ्या असतात. सुदैवी, धर्माने वागणारे, सत्यवादी, व शुद्ध मनाचे असतात. सहसा न चिडणारे व नम्र स्वभावामुळे सर्वांचे लाडके असतात. कामाच्या ठिकाणी स्वतःची गुणवत्ता सिध्द करतात. नावाप्रमाणेच हा योग अतिशय शुभ आहे. यांना कधीही पैशाची ददात रहात नाही. संत - साधु मंडळीचा आशिर्वाद लाभतो.
२४) शुक्ल :- ३०६°|४०' - ३२०°|००'
या योगावर जन्मणारे जातक खुप सत्यवादी, बुद्धिमान, सुंदर व प्रसिद्ध असतात. यांना धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करणे आवडते व ललित कलांमध्येहि गती असते. कलेच्या कोणत्याही आविष्कारात हे पारंगत होऊ शकतात. यांना कवित्वाची आवड असते व स्वतः उत्तम कवि असतात. शिक्षणात रस असतो. सधन असतात. स्वतःच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाने लोकांवर छाप पाडतात.
२५) ब्रह्म :- ३२०°|००' - ३३३°|२०' 
हा योग जातकासाठी अतिशय शुभ आहे. यांची देवावर प्रचंड श्रद्धा असते. पवित्र धर्मग्रंथांचे ज्ञान होण्यासाठी प्रयत्न असतो. विद्वान लोकांशी मैत्री असते. बळकट व धैर्यशील वृत्तीचे असतात. वेद- उपनिषदांचा अभ्यास करतात. सर्वमान्य असे भाषण करतात. हठयोगद्वारे साधना करु शकतात. समाजात प्रेम व आदर मिळवतात.     
२६) इंद्र :- ३३३°|२०' - ३४६°|४०'
    या योगावरील जातक नि:स्वार्थी, अतिशय धनवान, व सुदैवी असतात. ते यशस्वी, अधिकारी व प्रत्येक कर्तव्य उत्कृष्टपणे पार पाडणारे असतात. कौटुंबिक सौख्य उत्तम मिळते. व्यवहार कुशलतेने पार पाडतात. पण या योगाची अशुभ बाजु म्हणजे जातकाची आयुर्मर्यादा कमी असते.
२७) वैधृति :- ३४६°|४०' - ३६०°|००'
हा अशुभ योग आहे. या योगावरिल जातक लोभी, अतिशय बडबड्या स्वभावाचे व आयुष्यातील सुरुवातीची काही वर्षे द्विधा मन:स्थितीचे असतात. पण हे लोक उत्साही व सकारात्मक असतात. हाती घेतलेले काम खिलाडूवृत्तीने पूर्ण करतात. इतरांना मदत करण्याची तयारी असते. आधुनिक जीवनशैलीची आवड असते. यांचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन इतरांपेक्षा वेगळा असतो. 

No comments: