........... 2019
वर्ष संपत आलं की सगळीकडे सकारात्मक विचार, सदिच्छा, नव्या आशा वगैरेचं पेव फुटतं नाही ? नवीन वर्षाचे नवे संकल्प, स्वतःची वेगळी ओळख तयार करण्याची नवी जिद्द , हे सुद्धा वर्षअखेर ठेवणीतून बाहेर काढले जातात. फेब्रुवारीपर्यंत हा उत्साह मोप असतो आणि मग हळूहळू माघाची थंडी लागल्यासारखे हे संकल्प जरा मंदावतात. मार्च- एप्रिलमधे आपल्याला ते आत कुठेतरी आठवत असतात पण आपणा त्याकडे दुर्लक्षच करतो. कदाचित या mindset मुळेच “आधीच उल्हास , त्यात फाल्गुन मास” ही म्हण पडली असावी का? पण खरंच भिंतीवरचं calendar नवीन असतं; बाकी routine विशेष कुठे बदलते आपलं? हं, काहीजण नवीन नोकरीधंद्याला लागतात किंवा कोणाच्या आयुष्यात कोणाची सुखद entry किंवा कधी चटका लावणारी exit असा विचार थोडा बाजूला ठेऊ पण इतर विशेष बदल होत नाही हे निश्चित. तरीही नवीन वर्ष उजाडायचा आनंद केवढी असतो नाही? का असेल असे ?
सतत पुढे जायची उमेद, सतत पुढचे Plans. लहानांना मोठं व्हायचं असतं, मोठ्यांना अनुभवी व्हायचे असतं आणि अनुभव असलेल्यांना .... त्यांना ' मोठेपण ' हवं असतं. वर्ष सरत आलं की कोणी ठरवतं , " मी आता जरा स्वतःकडे लक्ष देणार" तर कोणी ठरवतं, " मी आता जरा कुटुंबाला वेळ देणार. " कोणी रागावर control ठेवणार तर कोणी पैशाचं नियोजन करणार, तरीसुद्धा पुढच्या वर्षअखेर काहीतरी नवीन ध्येय असतंच .
एखादा तरी बदल असा करायला हवा की त्यानंतर आपल्याला कधी बदल करायची ''गरज" वाटणार नाही. आहे ते सगळं योग्य वाटेल. तो बदल म्हणजे, आहे त्या गोष्टित समाधान वाटून घ्यायला, ते appreciate करायला शिकलं पाहिजे. याचा अर्थ नवीन ध्येय ठेवायचंच नाही असं नाही बरंका ! पण जे मिळवलंय त्याबद्दल appreciation नको का ? साधं बघा ना ..... कोणी दहावी झाल्यावर भेटायला आलं की आपण विचारतो आता पुढे काय?, कोणी नवीन नोकरी लागल्याचे पेढे दिले की म्हणतो " अरे वा ! आता लग्न कधी ?" लग्न होऊन वर्ष उलटतंय नाही की गोड बातमी कधी ?
अरे पण जे आहे त्याबद्दल काय? नुसतं अभिनंदन ....? मोठ्यांचे आशिर्वादसुद्धा कसे, तर जे पाहिजेते मिळो!..... नको हो ..... जे आहे त्यात आनंद मिळो असे म्हणाना.
" ठेविले अनंते, तैसेचि रहावे" या उक्तीचा खुप चुकीचा अर्थ काढतो आपण. आपले जे मूळ रूप आहे, ते निखळ आनंदाचं आहे तसेच तुम्ही रहा असा अर्थ होतो आणि त्याकरता ते पुढे सांगतात , " चित्ति असो द्यावे समाधान ! "
प्रयत्न करू नका, ध्येय ठेऊ नका असे अजिबातच नाही, पण त्याआधी जे मिळवलंय त्याबद्दल आनंद माना. New Year Party ही नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी नाही तर मागच्या वर्षी मिळालेल्या यशाचं समाधान व्यक्त करायला करा. मिळालेल्या यशाचे समाधान आणि येणाऱ्या वर्षात असलेले ध्येय यांचे गोड नाते जपणे हे आपल्याच हाती आहे.
WELCOME 2020 पेक्षा THANK YOU 2019 हे जास्त दिलासादायक आहे.
—- Pradnya Tikhe.
No comments:
Post a Comment